भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 21, 2024 15:53 IST2024-02-21T15:52:21+5:302024-02-21T15:53:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला...

भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका
पिंपरी : अजित दादा भाजपसोबत गेल्याने त्यांची व्होट बँक कमी झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पाडणार म्हटले, पण तेच लोकसभेला चार जागा लढणार, अशी चर्चा आहे. त्यांच्यात प्रफुल पटेल हेच हुशार आहेत, असे वाटते. त्यांनी चार वर्षे बाकी असतानादेखील राज्यसभेवर पाठवण्यात आले. बाकी नऊ जणांना काहीच मिळाले नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी अजून दहा ते पंधरा मोठे नेते त्यांच्यावर असलेल्या दबावामुळे भाजपमध्ये सामील होतील. सध्या गृहखाते फेल झाले आहे. लोकांची घरे फोडण्यात आणि राजकारण करण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अडकले आहेत. त्यामुळे त्यांना खात्यांवर लक्ष देण्यात वेळ नाही. अनिल तटकरे आणि सुनील तटकरे यांचा वाद आजचा नाही ते आमच्या संपर्कात होते. आजही आहे पण त्यांना अजून कोणतेही पद दिले नाही. त्यांना कोणते पद द्यायचे ते जयंत पाटील ठरवतील. योगेंद्र यादव यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांची प्रगती शरद पवारांमुळेच...
अजित पवार यांना ज्या पद्धतीने पदोन्नती मिळत गेली, त्याला आम्ही कुटुंब म्हणून बघितले आहे. ते म्हणतात रोहित पवारांची राजकीय प्रगती ही शरद पवारांमुळेच झाली आहे. मात्र, अजित पवारांची प्रगती कोणामुळे झाली तेही पाहावे लागेल. अजित पवारांनी जो निर्णय सत्तेसाठी किंवा आपल्यावर होणारी कारवाई थांबावी यासाठी घेतला असेल तर आम्हाला कुटुंब म्हणून निर्णय आवडला नाही, तर लोकांना कसा आवडेल, असा सवाल त्यांनी केला.