स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

By राजू इनामदार | Updated: May 3, 2025 15:16 IST2025-05-03T15:16:10+5:302025-05-03T15:16:51+5:30

भाजपचा चेहरा म्हणून कदाचित अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात येईल, हे मी नाही तर भाजपचे नेते अमित शाह यांनीच जाहिरपणे सांगितले आहे.

Ajit Pawar will be the Chief Minister only if he merges his own party with BJP; Sanjay Raut's attack | स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

पुणे: स्वत:चा पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केला तरच भाजपचा चेहरा म्हणून अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, अन्यथा नाही. एकनाथ शिंदेचेही तेच आहे, भाजपत गेले तर कदाचित त्यांना संधी मिळेल असा टोला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पवार व शिंदे यांना लगावला. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे या अजित पवार यांच्या विधानावर ते बोलत होते.

खासगी कामासाठी पुण्यात आलेल्या राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांबरोबर संवाद साधला. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे तसेच महापालिका निवडणुक समन्वयक वसंत मोरे त्यांच्यासमवेत होते. राऊत म्हणाले, “अजित पवार काहीही म्हणत असले तरी ते आता किंवा एकनाथ शिंदे बाहेर राहून कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना त्यांचा पक्ष भाजपात विलिन करावा लागेल, तरच भाजपचा चेहरा म्हणून कदाचित त्यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. हे मी नाही तर भाजपचे नेते अमित शाह यांनीच जाहिरपणे सांगितले आहे.”

पहलगाम हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिहारला जाऊन तिथून पाकिस्तानला खडसावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही राऊत यांनी टिकेचे लक्ष्य केले. जगातील कोणत्या देशाचे पंतप्रधान देशावरील हल्ल्यानंतर प्रचारसभेला जातील, दौरे करतील असा प्रश्न राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी आम्ही धडा शिकवू वगैरे सांगत आहेत, मात्र या हल्ल्यानंतर त्यांनी देशाप्रती, मुृत्यूमूखी पडलेल्यांप्रती संवेदना दाखवली नाही. त्याऐवजी ते उदघाटने करत आहेत, उद्योगपतींना भेटत आहेत असे ते म्हणाले.

हल्ल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत असा आरोपही राऊत यांंनी केला. हल्ला झाला तिथे आवश्यक सुरक्षा व्यवस्था नव्हती हे स्वत: शाह यांनीच सांगितले आहे. मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला गेला. अशाच एका हल्ल्याच्या वेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला गेला. ही सर्वसाधारण पद्धत आहे, इथे तर गृहमंत्री स्वत:च सर्वपक्षीय बैठकीत, हल्ला झाला तिथे आवश्यक बंदोबस्त नव्हता असे सांगतात. मग त्यांचा राजीनामा का मागितला जात नाही असे प्रश्न राऊत यांनी केला.

Web Title: Ajit Pawar will be the Chief Minister only if he merges his own party with BJP; Sanjay Raut's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.