Ajit Pawar: 'मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार'; पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:29 IST2021-12-30T13:28:08+5:302021-12-30T13:29:08+5:30
राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता मागे सरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar: 'मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार'; पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले
पुणे-
राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता मागे सरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी मी पाठवलं असतं तर सत्ता स्थापन झाली असती असं म्हणत साऱ्या चर्चा फेटाळून लावल्या. याच मुद्द्याबाबत आज अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
अजित पवार आज पुण्यात कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं असं म्हटलं जात आहे, याबाबत विचारलं असता अजित पवार चांगलेच संतापले. "हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे", असं अजित पवार म्हणाले.
कोरोना वाढतोय, काळजी बाळगणं गरजेचं
ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मी तर नेहमीच मास्क वापरण्याबाबत काटेकोरपणे सर्वांत सांगत आलो आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत सरकारला विचार करावा लागेल. ओमायक्रॉनची तीव्रता सौम्य असली तरी तो कोरोनाच आहे हे जनतेनं लक्षात घ्यावं. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी बाळगणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांनीही लग्न समारंभांबाबत जरा सामाजिक भान राखून निर्णय घ्यावेत, असं अजित पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनाही दिलं प्रत्युत्तर
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेऊन महाविकास आघाडी सरकारनं असमजूतदारपणा दाखवून दिला आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना 'काही जणांना समजूतदारपणा काय आणि असमजूतदारपणा काय हेच कळत नाही. आम्ही निवडणूक घ्यायला तयार होतो. पण राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करत समजूतदारपणाचच काम केलं आहे", असं अजित पवार म्हणाले.