Ajit Pawar | सांडपाणी करतंय खडकवासला धरणाला प्रदूषित, उपाययाेजना करा- अजित पवार
By नितीन चौधरी | Updated: March 21, 2023 16:39 IST2023-03-21T16:38:42+5:302023-03-21T16:39:09+5:30
पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करावी...

Ajit Pawar | सांडपाणी करतंय खडकवासला धरणाला प्रदूषित, उपाययाेजना करा- अजित पवार
पुणे : ‘पुणे शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात गेल्या काही वर्षांत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये रहिवासी प्रकल्पांसह काही व्यावसायिक प्रकल्पसुद्धा सुरू झाले आहेत. या प्रकल्पांतून प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते. या सांडपाण्यामुळे धरणांतील पाणी प्रदूषित होते. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करावी,’ अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
पवार म्हणाले, ‘राज्यात सर्वाधिक धरणे पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील या धरण परिसरात अनेक लोक सेकंड होम तसेच रिसॉर्ट उभारत आहेत. गेल्या काही दिवसांत अशा प्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकल्पांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते. हे सांडपाणी पुणे शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पवना, टेमघर, वरसगाव, पानशेत, चासकमान, भामा-आसखेड या धरणांतील पाण्यात मिसळून पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. धरणातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकाससह संबंधित खात्यांचा समन्वय करत राज्य सरकारने तातडीने ठोस कार्यक्रम राबवावा.’