पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार; अजित पवारांची मोठी घोषणा, आराखड्याबद्दलही दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:54 IST2025-07-24T16:52:08+5:302025-07-24T16:54:52+5:30

Ajit Pawar on Pune Growth Hub: यशदाचा आराखडा तयार झाल्यानंतर मनपा, पीएमआरडीए यांच्यासह संबंधित यंत्रणा करणार कामाची अंमलबजावणी

Ajit Pawar said Pune Metropolitan Region to set up Growth Hub also tells about planning | पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार; अजित पवारांची मोठी घोषणा, आराखड्याबद्दलही दिली माहिती

पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार; अजित पवारांची मोठी घोषणा, आराखड्याबद्दलही दिली माहिती

Ajit Pawar on Pune Growth Hub: पुणे महानगर प्रदेश (PMR) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा 'यशदा' करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

केंद्र सरकारने २०२४च्या अर्थसंकल्पात भारतासाठी १४ ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), वायझॅग (आंध्रप्रदेश) आणि वाराणसी (उत्तरप्रदेश) या चार शहरी क्षेत्रात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये ग्रोथ हब (G-HUB) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली असून आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्र ग्रोथ हब (G-HUB) म्हणून विकसित करण्यासाठी तयारी सुरू आहे, अशी महत्त्वाची माहिती अजित पवार यांनी दिली.

"नीती आयोगाने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश केला. पुण्यामध्ये आयटी कंपन्या, कारखाने, मेट्रो, रिंग रोड, औद्योगिक कॉरिडोर्स आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, दवाखाने असल्याने ग्रोथ हब बनण्यासाठी पुणे महानगर प्रदेश आघाडीवर आहे. पुण्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था यशदा पुणे महानगर प्रदेश क्षेत्रासाठी आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार असून कामाबाबतचे निरीक्षण विभागीय आयुक्त करणार आहेत. यशदाचा आराखडा तयार झाल्यानंतर मनपा, पीएमआरडीए यांच्यासह संबंधित यंत्रणेने कामाबाबत अंमलबजावणी करावी," असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

"पुण्याचे सकल उत्पन्न ४.२ लाख कोटी असून २०३० पर्यंत १५ ते १८ लाख नोकऱ्या तयार होणार आहेत. यामध्ये किमान ६ लाख महिला कामगार असतील असे नियोजन करण्यात येणार असल्याने देशात सर्वात प्रथम आर्थिक विकास आराखडा स्वीकारणाऱ्या शहरात पुणे असेल. यामुळे पुणे महानगर विकास प्राधिकरणासह पुण्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सुरू असलेल्या विविध प्रकल्पातील कामात सातत्य ठेवावे," असेही अजित पवार यांनी सांगितले. कामाच्या प्रगतीसाठी पुण्यामध्ये यशदा येथे लवकरच सर्व संबंधित यंत्रणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.

ग्रोथ हबबद्दल ठळक मुद्दे

  • ग्रोथ हबसाठी आवश्यक प्रमुख विकास घटक पुण्यात तंत्रज्ञान व नवप्रवर्तन केंद्र, माहिती तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन उपलब्ध आहेत.
  • एमआयडीसी क्षेत्रांमध्ये (चाकण, तळेगाव, रांजणगाव इ.) ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, प्रिसीजन इंजिनीयरिंग आणि फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. आठशेहून अधिक उच्च शिक्षण संस्थांचा लाभ घेऊन भारताचे टॉप विकसित कौशल्य घेणाऱ्यांची सेवा पुरविणारे स्किलिंग-एक्सपोर्ट शहर होणार आहे.
  • मेट्रो व रिंगरोड कॉरिडोरसह नवीन टाउनशिप असल्याने हरित आणि स्मार्ट नागरीकरणास पोषक वातावरण आहे. पुण्यात पर्यटनासाठी वाव असल्याने वारसा पर्यटन, कृषीपर्यटन, आध्यात्मिक सर्किट, अ‍ॅडव्हेंचर झोन्ससाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
  • कौशल्य प्रमाणपत्र, स्टार्टअप गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने परदेशी गुंतवणुकीतही वाढ होणार आहे.

Web Title: Ajit Pawar said Pune Metropolitan Region to set up Growth Hub also tells about planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.