इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक विमान अपघातातील मृत्यूने संपूर्ण इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या जाण्याच्या बातमीने तालुक्यातील जनतेला हादरवून टाकले असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून दुखवटा पाळला आहे.
बारामती ही अजित पवारांची कर्मभूमी असली तरी इंदापूर तालुक्यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. तालुक्याच्या प्रत्येक मतदाराला ते कधीच परके वाटले नाहीत. नेहमीच समर्थ राजकीय पर्याय देऊन तालुक्यातील राजकारणात एकसंधता येऊ दिली नाही. ग्रामीण भागात वाढलेल्या अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वात अस्सल गावरान सरळपणा आणि अक्कडबाज रांगडेपणा होता. व्यासपीठावर ते नेहमी खुलेपणाने बोलत, लपवाछपवी न करता जे मनात ते थेट सांगत. यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांना नेहमीच ‘मालमसाला’ मिळत असे.अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
इंदापूरच्या राजकारणात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात दशकानुदशके टोकाचा संघर्ष राहिला. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रभावाला पर्याय देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी सातत्याने केला. ते कार्यकर्त्यांचे खऱ्या अर्थाने नेते होते– ऐकून घेत, चुकीचे असल्यास तोंडावर सांगत आणि काम होत असल्यास तत्काळ पूर्ण करत. जवळच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन मोठे करण्यात त्यांचा हातभार होता. प्रसंगी शरद पवारांच्या धोरणांकडेही दुर्लक्ष करून त्यांनी कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले.
विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक प्रमुख नाव. छत्रपती सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषदेतील पदांवर अजित पवारांनीच भरणे यांना पोहोचवले. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली असताना अजित पवारांनी संपूर्ण कुमक भरणे यांच्या पाठीशी उभी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले. मंत्रिपद आणि तालुक्यातील विकासकामे यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा होता.
सर्वसामान्यांच्या विकासासाठी काय हवे याची अजित पवार यांना अचूक जाण होती. इंदापूर व्यापारी संघटनेने शिरसोडी ते कुगाव पुलाची मागणी केल्यानंतर तासाभरात जाहीर सभेत त्यांनी निधीची घोषणा केली. आज ते काम युद्धपातळीवर सुरू आहे – हे सर्व अजितदादांमुळेच शक्य झाले.
स्वप्न अधुरेच
३० नोव्हेंबर २०२५ रोजी इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या सांगता सभेसाठी आलेले अजित पवार यांची ती इंदापूरची शेवटची भेट ठरली. “विकास कसा करायचा ते दाखवून देतो,” असे ते म्हणाले होते. इंदापूरकरांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, सत्ता राष्ट्रवादीकडे आली. पण, त्यांच्या अकस्मात निधनाने शहर विकासाचे स्वप्न अधुरेच राहिले. शास्तीकराविषयी ठोस निर्णय अपेक्षित होते, तेही लांबणीवर पडले. अलीकडेच जिल्हा परिषद निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले होते – तालुका विकासासाठी ही सकारात्मक घटना होती. पण, मनोमिलनाला दृढता मिळण्याआधीच अजितदादा निघून गेले. ही अपूर्णता कार्यकर्ते आणि मतदारांच्या मनात कायमची छळणार आहे.
वयाच्या २५ व्या वर्षी केला सहकारात प्रवेश
१९८४ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्यापासून अजित पवारांनी सहकार आणि सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला. १९९१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद मिळाले. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ठोस निर्णय घेतले – शिरसाई उपसा सिंचन योजना, नीरा-भीमा नदी जोड प्रकल्प, ऐतिहासिक गढी-दर्ग्याचे संवर्धन, रस्ते-पाणीपुरवठा योजना, न्यायालय इमारती, साखर कारखाने-दूध संघांना बळकटी अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
त्याचे डोळे अश्रूंनी अविरत भरत आहेत
जिवाला जीव देणाऱ्या अजित पवारांना शेवटच्या घटकेला कोणत्या यातना झाल्या असतील याची कल्पना करताकरता इम्तियाजचे डोळे सतत वारंवार भरून येत आहेत. तो कोणाशी बोलण्याच्या मनःस्थितीत नाही. इम्तियाज मोमीन इंदापूरमधील दर्गा मशीद चौक परिसरातील रहिवासी. गेल्या अनेक वर्षांपासून तो अजितदादांचा पोलिसदलातील अंगरक्षक म्हणून कर्तव्य पार पाडत आहे. नेहमी सावलीसारखा अजित पवारांबरोबर असणारा इम्तियाज, त्यांच्या जिवावर गुदरलेल्या प्रसंगाच्या वेळी त्यांच्यासमवेत नव्हता... अजित पवारांचे प्राण वाचविण्यासाठी आपण जिवाची बाजीदेखील लावली असती, असे तो म्हणतो. जिवाला जीव देणाऱ्या अजित पवारांना शेवटच्या घटकेला कोणत्या यातना झाल्या असतील याची कल्पना करताकरता इम्तियाजचे डोळे सतत वारंवार भरून येत आहेत.
Web Summary : Ajit Pawar's sudden demise has plunged Indapur into mourning. His political journey began here, and he significantly contributed to its development. His work in irrigation, infrastructure, and support for local leaders leaves a void. The unfulfilled dreams for Indapur's progress now cast a shadow over the region.
Web Summary : अजित पवार के आकस्मिक निधन से इंदापुर में शोक की लहर है। उनका राजनीतिक सफर यहीं से शुरू हुआ, और उन्होंने इसके विकास में महत्वपूर्ण योगदान दिया। सिंचाई, बुनियादी ढांचे और स्थानीय नेताओं के समर्थन में उनके काम से एक खालीपन आ गया है। इंदापुर की प्रगति के अधूरे सपने अब क्षेत्र पर एक छाया डाल रहे हैं।