अजितदादा ऍक्टिव्ह नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा ? वाचा काय म्हणाले अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 11:34 IST2022-01-26T11:32:58+5:302022-01-26T11:34:47+5:30
अजित पवार म्हणाले, " काही गोष्टी या दाखवायच्या नसतात...

अजितदादा ऍक्टिव्ह नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा ? वाचा काय म्हणाले अजित पवार
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (ajit pawar) हे अद्यापही सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. या चर्चेवर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, " काही गोष्टी या दाखवायच्या नसतात. नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं हे मला चांगलंच माहीत आहे. 1992 पासून मी राजकारणात काम करत असून आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. निवडणुकी संदर्भातल्या बर्याचशा गोष्टी उघड उघड करायच्या नसतात. आमचं काम योग्य रीतीने सुरूच आहे. तरीही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना समजावून सांगण्याचे काम आम्ही करू".
अजित पवार म्हणाले, सध्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याला माझे प्राधान्य आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला अर्थसंकल्पात किती रक्कम द्यायची, त्यांच्या मागण्या काय आहेत? याबद्दल सरकारची भूमिका काय असली पाहिजे? या कामात मी सध्या व्यस्त आहे.. पक्षाच्या कामासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांचं काम योग्य रीतीने करत आहेत.
महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना ही निवडणुकीसाठी प्रभाग रचना अजून जाहीर झाली नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी ज्या अजित पवारांवर अवलंबून आहे ते अजूनही शहरात सक्रिय झालेले दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये सुरू आहेत. अजित पवारांच्या या उत्तराने आता या चर्चेला विराम बसेल.