पुणे ते बेळगावदरम्यान ऑक्टाेबरपासून करा हवाई प्रवास! खासदार इरान्ना कडाडी यांची घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 12:00 IST2023-08-15T11:59:57+5:302023-08-15T12:00:43+5:30
यासंदर्भातील घोषणा खासदार इरान्ना कडाडी यांनी केली आहे...

पुणे ते बेळगावदरम्यान ऑक्टाेबरपासून करा हवाई प्रवास! खासदार इरान्ना कडाडी यांची घाेषणा
पुणे : प्रवाशांची गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी असलेल्या पुणे-बेळगाव विमानसेवेला येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होत आहे. यासंदर्भातील घोषणा खासदार इरान्ना कडाडी यांनी केली आहे.
जवळ जवळ वर्षभरापासून या मार्गावरील उड्डाणे बंद होती. मात्र, या मार्गावरील हवाई सेवा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी बेळगावच्या लोकप्रतिनिधींबरोबरच हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी देखील केंद्रीय नागरी हवाई मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. पूर्वी ‘उडान’ योजनेंतर्गत चालवण्यात येत असलेल्या बेळगाव-पुणे उड्डाणास उद्योजक, व्यावसायिक, आयटी क्षेत्र, विद्यार्थी, पर्यटक यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळत होता. ही उड्डाणे बंद झाल्यानंतर दोन्हीही शहरातून यासाठी सतत मागणी केली जात होती.
ही विमान सेवा पडल्यामुळे सध्या प्रवाशांना बेळगावला विमानाने जाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. अनेक जण पुणे-हुबळी विमानाने हुबळीला जाऊन तेथून गाडीने बेळगावला जायचे. यामुळे पैसे आणि वेळेचा अपव्यय होत होता. बेळगावहून पुणे उड्डाण ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत असल्यामुळे पुणे-बेळगाव व परिसरातील अर्थचक्रास मोठी गती मिळणार आहे.
पुणे-बेळगाव अशी असेल सेवा...
१) इंडिगो एअरलाइन्सचे उड्डाण आठवड्यातून तीन दिवस
- मंगळवार, गुरुवार, शनिवार (३१ ऑक्टोबर पासून)
२) स्टार एअरलाइन्सचे उड्डाण २९ ऑक्टोबरपासून दररोज
पुणे-बेळगाव विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीची पूर्तता केल्याबद्दल केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्र्यांचे आभार मानतो. पण, गेल्या वर्षभरापासून बंद असलेली पुणे-नाशिक विमानसेवादेखील लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीचा मी पुनरुच्चार करतो.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ.