भारताच्या 'एलओसी' पार मुसंडीमुळे पाकीस्तान हादरला :एअर मार्शल भूषण गोखले यांची विशेष मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:45 PM2019-02-26T14:45:35+5:302019-02-26T14:50:26+5:30

१९६५ आणि १९७१ चा अपवाद वगळता त्यानंतर भारताने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. आज मात्र भारतीय वायु सेनेने मंगळवारी पहाटे खोलवर घुसून हल्ला केला. गाफील पाक सैन्यासाठी हा मोठा दणका आहे.

Air Marshal Bhushan Gokhale's Special Interview on Indian Air Strike | भारताच्या 'एलओसी' पार मुसंडीमुळे पाकीस्तान हादरला :एअर मार्शल भूषण गोखले यांची विशेष मुलाखत 

भारताच्या 'एलओसी' पार मुसंडीमुळे पाकीस्तान हादरला :एअर मार्शल भूषण गोखले यांची विशेष मुलाखत 

googlenewsNext

पुणे : आंतरराष्ट्रीय दबावापोटी भारत स्वत:हून लाईन ऑफ कंट्रोल (नियंत्रण रेषा) स्वत:हून कधीच ओलांडणार नाही. भारताचा प्रतिकार केवळ भारत भूमीपुरताच मर्यादीत असेल, या भ्रमात पाकिस्तान आजवर होता. कारण १९६५ आणि १९७१ चा अपवाद वगळता त्यानंतर भारताने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. आज मात्र भारतीय वायु सेनेने मंगळवारी पहाटे खोलवर घुसून हल्ला केला. गाफील पाक सैन्यासाठी हा मोठा दणका आहे. पाकच्या हद्दीत ऐंशी किलोमीटर मुसंडी मारुन केलेला हा हल्ला पाकिस्तानला हादरवणारा आहे. निवृत्त एयर मार्शल भूषण गोखले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, ६५ आणि ७१ च्या युद्धानंतर आपण एलओके न ओलांडण्याचे भान पाळले कारण आपल्याला परिस्थिती चिघळू द्यायची नव्हती. त्यामुळे आपला प्रतिकार मिळमिळीत वाटत होता.  

             गोखले यांनी तीस वर्षांहून अधिक भारतीय वायु सेनेत सेवा केली आहे. विविध प्रकारची लढाऊ विमाने चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव गोखले यांना आहे. अनेक पायलट्सना त्यांनी प्रशिक्षण दिले. भारताच्या कित्येक हवाई हल्ल्यांचे नियोजन आणि आखणीबरहुकूम त्याची अंमलबजावणी करण्यात गोखले सहभागी राहिलेले आहेत. केंद्र सरकारचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोखले यांनी स्वत: १९७१ च्या युद्धात लढावू विमानांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला होता. या सेवेबद्दल गोखले यांना वायु सेवा मेडल आणि अति विशिष्ट सेवा मेडलने गौरविण्यात आले आहे. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचा अनुभव असलेल्या गोखले यांनी मंगळवार पहाटेच्या हल्ल्याबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला. स्वत:चे कोणतेही नुकसान न होऊ  देता अचूक आणि थेट हल्ला करुन शत्रुची दाणादाण उडवून परत आलेल्या भारतीय वायुसेनेचा अभिमान वाटतो, ही गोखले यांची पहिली प्रतिक्रीया होती. एयर मार्शल (नि.) गोखले यांच्याशी लोकमतने साधलेला संवाद -

  • भारताने केलेला हल्ला हा भारत भूमीवरचा आहे, की पाकिस्तानमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला, या बद्दलचा संभ्रम सर्वप्रथम दूर करा.

              भारताच्या मिराज-२००० या एकूण बारा लढाऊ विमानांनी एलओसी ओलांडून हल्ला केला. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्ताननेही त्याला दुजोरा दिला आहे. बालाकोट हा परिसर पख्तुनिस्तान म्हणजेच सध्याच्या पाकव्याप्त कााश्मिरमध्ये आहे. हा आपलाच भाग होता. तिथे तर आपण हल्ला केलाच पण त्याच्याही पलिकडे पाकिस्तानमध्ये आपल्या विमानांनी घुसून हल्ला केला. पहिल्यांदाच आपण एलओसी क्रॉस केली. त्याचे कारण दहशतवाद्यांचे अड्डे जमिनीवरुन हल्ला करण्याच्या मर्यादेबाहेर पाकव्याप्त काश्मिरात आहेत. पाक सैन्याकडून शस्त्रास्त्रे, दारुगोळा यांची रसद मिळवणे अशा ठिकाणी त्यांना सुलभ असते. तसेच पाक सैन्यालाही त्यांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे या दृष्टीने सोईच्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे वसवण्यात आले आहेत. ते उध्वस्त करण्यासाठी केवळ विमानांनीच हल्ला करणे शक्य आहे. कारण आपली कोणतीही हानी होऊ न देता दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करुन आपल्याला सुरक्षित परतायचे असते. एयरफोर्सने हे काम अगदी अचूक केल्याने मी आज खूश आहे. म्हणून मुद्दाम आकाशी शर्ट घातला. कारण, भारताच्या एयरफोर्सचा रंग आकाशी आहे.

 

  • भारत कधीच एलओसी ओलांडणार नाही, या भ्रमात पाकिस्तानला ठेवण्यात भारत यशस्वी झाला का ?

           अगदीच. हल्ल्याची वेळ फार महत्त्वाची असते. सेवेत असताना मी नेहमी सर्के डीयन लो या मानवाच्या जैविक घडाळ््याबद्दल सांगायचो. पहाटे दोन ते चार ही वेळ त्या दृष्टीने अगदीच महत्त्वाची कारण त्यावेळी बहुतेक सगळे गाफील असतात. शिवाय कालच आपण वॉर मेमोरियलचे उद्घाटन करुन आपल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पाकला गाफील ठेवण्यात आपण यशस्वी झालो यात शंकाच नाही. कारण एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर भारत एलओसी ओलांडणार नाही, असेच पाकिस्तान समजत होता. अगदी कारगील युद्धातसुद्धा, ज्यावेळी मी एयर फोर्समध्ये कार्यरत होतो, तेव्हाही आम्हाला एलओसी ओलांडण्यास बंदी होती. भारतीय सैन्य डोंगराच्या पायथ्याला आणि पाक सैन्य माथ्यावर असल्याने आपले अनेक सैनिक शहीद होत होते. त्यावेळी भारताच्या मिराज विमानांनी एलओसीचे उल्लंघन न होऊ देता टायगर हिलवरुन लेझर गायडेड बॉम्बचा हल््ला चढवल्याने विजय समीप आला. आपली जीवीतहानी वाचली.

 

  • भारताने यापुर्वी एलओसी किती वेळा ओलांडली?

         देश स्वतंत्र झाला तेव्हा १९४७ मधली परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्याचा संदर्भ मी देणार नाही. पण ६५ मध्ये आॅपरेशन जिब्रॉल्टर म्हणून पाकिस्तानने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. श्रीनगरच्या लाल चौकात आणि पुढे दिल्लीत पाकिस्तानी झेंडा फडकवण्याची भाषा भुट्टोंनी केली. त्यावेळी आपण एलओसीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सीमादेखील ओलांडली होती. ७१ च्या युद्धात तर आर्मी, नेव्ही, एयरफोर्स या तिन्ही दळांच्या ताकदीचा वापर भारताने केला. लाहोर, सियालकोटपासून आपण फक्त वीस किलोमीटर अंतरावर जाऊन पोचलो होतो. त्यानंतर पहिल्यांदाच आपण पाकिस्तानात घुसलो आहोत. 

           आजच्या हल्ल्यातही आपण बराच अभ्यास केलेला होता. शत्रुच्या रडार यंत्रणेला गाफील ठेवून आपल्या रडार यंत्रणेकडून शत्रुची बित्तमबातमी मिळवत राहिलो. भारतीय बनावटीची नेत्रा एडब्ल्यूसी ही यंत्रणा हल्ल्यासाठी मदत करत होती. ड्रोन नजर ठेवून होते. हल्ल्याचे सखोल नियोजन झाले होते. सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे एलओसी ओलांडण्यासंदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार एयरफोर्सकडे होते. त्यामुळे मिराज विमानांच्या लेझर गायडेड बॉम्बनी दहा-बारा किलोमीटर दूर अंतरावरुन लक्ष्याचा अचूक वेध घेतला. त्यानंतर ते सुरक्षितपणे मागे वळू शकले.    

 

  • अचूक हल्ल्यांसाठी इंटेलजन्स खूप महत्त्वाचा ठरतो. एयर फोर्स आणि भारताच्या इतर यंत्रणांचा या संदर्भातला समन्वय कसा होता ?

फार चांगला मुद्दा. सर्जिकल स्ट्राईकसाठी अचूक माहिती असल्याशिवाय धाडस दाखवणे अंगलट येऊ शकते. माहिती गोळा करण्याचे अनेक मार्ग असतात. इलेक्ट्रॉनिक  इंटेलिजन्स महत्त्वाचा असतो. त्यासाठी शत्रुच्या ठिकाणांचे इमेजिंग, फोटो रेकगनेशन, सॅटेलाईट इन्फॉर्मेशन, शत्रुच्या हालचाली टिपणे आवश्यक असते. विमानांचे कॅमेरे, सॅटेलाईट कँमेरे, थर्मल इमेजिंग आदी माध्यमातून माहिती मिळवली जाते. आता आपल्या एयर फोर्सने ट्रेनिंग कॅम्प उध्वस्त केले याचा अर्थ असा, की ही सगळी माहिती आधी आपल्याकडे होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादी अड्यावर किती दहशतवादी होते, तिथे शस्त्रास्त्रे, दारुगोळ््याचा साठा किती होता, या सगळ््या बद्दलची खात्री पटल्याखेरीज असा हल्ला केला जात नसतो. शिवाय, अशा हल्ल्यांचा परिणाम नागरिकांवर होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. 

 

  • एलओसी ओलांडल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरुन काय प्रतिक्रीया उमटू शकते ?

या संदर्भात चीनचा अपवाद वगळता जग भारतासोबत आहे. पुलावामा हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी जैशने घेतली होती. जैशचे प्रमुख नेते आणि त्यांचे अड्डे पाकिस्तानात असल्याचे जगापुढे आले आहे. हाफीज सईद पाकिस्तानात उघडपणे फिरतो, हे जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारताने स्वसंरक्षणासाठी हल्ला केला आहे, हे उघड आहे. उलट यातून चीनलाही योग्य तो संदेश मिळाला आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात कोणी ढवळाढवळ करणार असेल तर भारत योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे आजच्या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे.  

 

  • या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून उमटणाऱ्या  प्रतिक्रीयेसाठी आपण तयार आहोत ?

या सगळ्या बाजूंचा विचार केल्याशिवाय एलओसी ओलांडण्याचा निर्णय होणार नाही. भारताच्या सर्व सीमांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवली जात असणार, हे स्पष्ट आहे. जैसेलमेरजवळ पाकिस्तानचे ड्रोन आपल्या सैन्याने पाडले यावरुन याची खात्री पटते. पाकिस्तानने हल्ला केला तरी भारत त्यांना कडक उत्तर देण्यास तयार असेल. पण मुद्दा हा आहे, की पाकिस्तान हल्ला करण्याची क्षमता राखून आहे का जनरल मुशर्रफ यांनी स्वत:च कबुली दिल्याप्रमाणे, मोठे युद्ध झाले तर पाकिस्तान बेचिराख होईल. त्यामुळे आता शहाणपणा दाखवायचा की नाही, हा पाकिस्तानपुढचा प्रश्न आहे.  कीप इंडिया ब्लिडींग असे चालणार नसल्याचा कडक इशारा आजच्या हल्ल्याने दिला आहे. ७१ च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. यापुढे चांगले वागाल तरच हित आहे, असा सज्जड इशारा आपण दिला आहे. आपला हल्ला अतिरेक्यांवर आहे. पाकिस्तानी नागरिकांवर नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनीही पाक सरकारवरचा दबाव आणला पाहिजे.

Web Title: Air Marshal Bhushan Gokhale's Special Interview on Indian Air Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.