पाकिस्तानला चकवा देणारे वायुदलाचे वीर ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 21:15 IST2025-08-10T21:14:13+5:302025-08-10T21:15:19+5:30
भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे.

पाकिस्तानला चकवा देणारे वायुदलाचे वीर ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांचे पुण्यात निधन
पुणे : १९६५ आणि १९७१ च्या युद्धात शौर्याची अमिट छाप सोडणारे भारतीय वायुसेनेचे निवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर पारुळकर (वय ८२) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे.
धडाडीचे, शूर आणि कर्तृत्ववान अधिकारी म्हणून पारुळकर यांची वायुदलात विशेष ओळख होती. मार्च १९६३ मध्ये त्यांनी भारतीय हवाई दलात प्रवेश केला. कारकिर्दीत त्यांनी एअर फोर्स अकादमी येथे ‘फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ म्हणून काम पाहिले. दोन वर्ष सिंगापूरमध्ये राहून आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवला, तर नॅशनल डिफेन्स अकादमीत ‘बटालियन कमांडर’ म्हणूनही ते कार्यरत होते.
१९६५ : एकहाती विमान सुरक्षित परत आणण्याचा पराक्रम
१९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांच्या लढाऊ विमानावर शत्रूंचा गोळीबार झाला. या हल्ल्यात उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. वरिष्ठांनी तत्काळ विमानातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी धैर्य दाखवत नुकसानग्रस्त विमान एकहाती भारतीय तळावर सुरक्षित उतरवले. या शौर्यासाठी त्यांना ‘वायु सेना पदक’ प्रदान करण्यात आले.
१९७१ : शत्रूराष्ट्रातून धाडसी पलायन
१९७१ च्या युद्धात नऊ यशस्वी मोहिमांनंतर दहाव्या मोहिमेदरम्यान पारुळकर यांचे विमान लाहोर येथे पाडण्यात आले. त्यांना पकडून पाकिस्तानातील रावळपिंडी छावणीत ठेवण्यात आले, जिथे आणखी १२ भारतीय वैमानिक होते. १९७२ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट एम. एस. ग्रेवाल व फ्लाइट लेफ्टनंट हारीश सिंहजी यांच्यासह त्यांनी शत्रूराष्ट्रातून यशस्वी पलायन केले. हा इतिहासातील सर्वात धाडसी पलायन प्रयत्न मानला जातो. २०१९ मध्ये आलेला “द ग्रेट इंडियन एस्केप” हा चित्रपट याच घटनेवर आधारित आहे.
भारत सरकारने त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ प्रदान केले. पारुळकर यांच्या निधनाने भारतीय वायुसेनेने एक अद्वितीय शूरवीर गमावला आहे.