दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यातील श्री चतु:श्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:45 PM2022-09-22T12:45:06+5:302022-09-22T12:45:15+5:30

यंदा उत्सवामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले राहणार

After two years of hiatus, Shree Chatu: Shringi Mata's Navratri festival in Pune will be celebrated with enthusiasm | दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यातील श्री चतु:श्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात रंगणार

दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यातील श्री चतु:श्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात रंगणार

Next

पुणे : दोन वर्षांनंतर श्री चतु:श्रृंगी देवीचा नवरात्रोत्सव २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा उत्सवामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले राहणार असून, देवीच्या दर्शनासाठी ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ‘श्री देवी चतु:श्रृंगी मंदिर ट्रस्ट’चे कार्यकारी विश्वस्त श्रीधर अनगळ आणि व्यवस्थापक विश्वस्त नंदकुमार अनगळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यानिमित्ताने मंदिरात रोज भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण आदी धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. सोमवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजता घटस्थापना होईल आणि त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण होणार आहे. रोज सकाळी दहा आणि रात्री नऊ वाजता महाआरती होईल. मंगळवारी (दि. ४) दुपारी २.३० ते ५.३० नवचंडी होम होणार आहे, तसेच विजयादशमीनिमित्त बुधवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजेपासून सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून निघेल. त्यात बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, वाघ्या मुरळीसह देवीच्या सेवेकऱ्यांचा सहभाग असेल. विशेष म्हणजे यानिमित्ताने हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

सध्या मंदिर परिसरात मंडप उभारणी, विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण परिसरात सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे यासाठी संपूर्ण बॅरिकेडिंगसह रांगांची व्यवस्था करण्यात येत आहे. ऑनलाइन ट्रस्टने भाविकांसाठी ऑनलाइन दर्शन पासची व्यवस्था केली आहे, तसेच मंदिर परिसरातदेखील ऑफलाइन दर्शन पास वितरणासाठी तीन काउंटर असणार आहेत. ऑनलाइन दर्शन पाससाठी मंदिराच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलीस दल, निमलष्करी दल कार्यरत असणार असून, मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. व्यवस्थापन साहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक कार्यरत असतील. अग्निशामक दलाची गाडी, भाविकांसाठी रुग्णवाहिक आणि कार्डिक ॲम्ब्युलन्सची सोय केली आहे. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा दोन कोटी रुपयांचा विमा केला आहे.

''मंदिर आणि परिसराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन नुकतेच झाले असून, याचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्याचे काम नवरात्रोत्सवानंतर लगेच सुरू होईल. - श्रीधर अनगळ'' 

Web Title: After two years of hiatus, Shree Chatu: Shringi Mata's Navratri festival in Pune will be celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.