पुणे : एकमेकांचा हात हातात घेऊन सात जन्म एकमेकांना साथ देण्याचे वचन देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करणाऱ्या एका जोडप्याला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. लग्नापूर्वी आपल्या शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पतीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार वर्षानंतर आपली फसवणूक झाल्याचे पतीला समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने पत्नीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारत मेट्रोमोनीवरुन लग्नगाठी जुळल्यावर त्यांचा संसार तब्बल चार वर्षे सुखात चालला होता. मात्र चार वषार्नंतर पतीला पत्नीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. ही फसवणूक म्हणजे पत्नीने मेट्रोमोनी साईटवर टाकलेले शिक्षण व नोकरीची माहिती खोटी होती. अशी माहिती प्रकाशात आल्याने या घटनेला वाचा फुटली. यानंतर पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. अभिषेक अलोक पालीत(32,रा.उंड्री) असे फिर्यादीचे नाव आहे. त्याच्या पत्नीने भारत मेट्रोमोनी या आॅनलाईन विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. यामध्ये तिने राजस्थान टेक्निकल इन्स्टिटयूट येथून बॅचलर ऑफ इंजिनिअचे शिक्षण पूर्ण केल्याचे तसेच मायक्रोसॉफ्ट दिल्ली येथे क्वॉलिटी टेस्टर म्हणून नोकरीस असल्याचे सांगितले होते. यामुळे फिर्यादीने तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर पुढील काही दिवसांनी फिर्यादीला पत्नीचे तिने माहिती दिल्यानुसार शिक्षण झाले नसल्याचे लक्षात आले. तसेच ती नोकरी करत नसल्याची बाब त्याने हेरली. याबाबत फिर्यादीने तिला विचारणा केली असता तिने खोटी तक्रार पोलीस स्टेशनला देईल, अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादीने तिच्याविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे करत आहेत.
शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पत्नीने केली पतीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 15:30 IST
लग्नापूर्वी आपल्या शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पतीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पत्नीने केली पतीची फसवणूक
ठळक मुद्देपत्नीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल