‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर ब्राह्मणच ठरतात’; अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादात
By राजू इनामदार | Updated: February 10, 2025 16:19 IST2025-02-10T16:19:17+5:302025-02-10T16:19:54+5:30
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सोलापूरकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविला

‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर ब्राह्मणच ठरतात’; अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादात
पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘अभ्यास करतो तो ब्राह्मण’ या वेदांमधील वचनाप्रमाणे ब्राह्मण ठरतात, असे वक्तव्य त्यांनी एका डिजिटल माध्यमावर बोलताना केल्याचे व्हायरल झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमधून सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर सोलापूरकर यांच्या निषेधाला सुरुवात झाली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी सोलापूरकर यांना आता ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा दिला.
खरात म्हणाले, सोलापूरकर यांची मानसिक तपासणी करून घेण्याची गरज आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, काहीही करून आपले ब्राह्मणत्व टिकायला हवे, या जाणिवेतून महाराष्ट्रात काहीजण त्रस्त झालेत. सोलापूरकर यांच्यापेक्षा डॉ. आंबेडकर यांचा हिंदू धर्माचा अभ्यास नक्कीच जास्त होता. तोच हिंदू धर्म त्यांनी नाकारला व हे ब्राह्मण्यत्वाने ग्रस्त झालेले काहीजण त्यांना ब्राह्मण ठरवायला निघालेत. त्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सोलापूरकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका प्रकरणाबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून सोलापूरकर नुकतेच अडचणीत आले होते. माफी मागून त्यांनी त्यातून सुटका करून घेतली होती. ते प्रकरण अजूनही धुमसत असतानाच आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत. त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.