पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 05:18 IST2025-07-28T05:13:55+5:302025-07-28T05:18:07+5:30

एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याने खराडीतील हॉटेलात आयोजित केली होती ड्रग्ज पार्टी, गुन्हे शाखेने पहाटे टाकला छापा  

action taken against rave party in pune 7 arrested including eknath khadse son in law pranjal khewalkar who husband of ncp sp group leader rohini khadse | पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले

पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : शहरातील खराडी परिसरातील स्टे बर्ड, अझुर सूट हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे कारवाई करत पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या पार्टीचे आयोजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याने केले होते. त्याच्या नावे ३ दिवसांपासून हॉटेलच्या ३ रुम बुक होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. हॉटेलमधून मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. यावेळी तीन महिला पसार झाल्याची माहिती आहे. 

गुन्हे शाखेने पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी स्टे बर्ड हॉटेलवर छापा टाकला. रूम नं. १०२ मधून डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (४१, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (३५,  पुणे), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (४१, पुणे), सचिन सोनाजी भोंबे (४२, वाघोली), बांधकाम व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (२७, रा. आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (२२, रा. औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (२३, म्हाळुंगे) यांना ताब्यात घेतले असून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

टीप कशी मिळाली? : या हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल पार्ट्या सुरू असतात अशी टीप गुन्हे शाखेला मिळाली होती. दाेन दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. 

हे साहित्य केले जप्त : २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, १० मोबाइल, दोन चारचाकी वाहने, हुक्का पॉट, दारू व बीअरच्या बाटल्या, हुक्का फ्लेवर असे ४१ लाख ३५ हजार रुपयांचे अमली पदार्थ, साहित्य जप्त केले. 

हा राजकीय सुडाचा प्रकार : खडसे  

एकनाथ खडसे म्हणाले की, हा राजकीय सुडाचा प्रकार आहे. जावयास मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असेल तर मी समर्थन करणार नाही. खडसे यांनी जावयाला आधी सावध करायला हवे होते. रेव्ह पार्टीत कोणी कोणाला कडेवर उचलून नेत नाही, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.  

कोण आहेत खेवलकर? 

प्रांजल खेवलकर हे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. खेवलकर यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे.  

दोन दिवस पोलिस कोठडी : आरोपी प्रांजल खेवलकर याच्यासह सातही आरोपींना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. खेवलकर यांच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही किंवा त्यांच्याकडे अमली पदार्थ मिळालेला नाही. द्वेषापोटी त्यांना गुन्ह्यामध्ये घेतले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या सात जणांना दोन दिवस पोलिस कोठडीत  ठेवण्याचा निर्णय प्रथमवर्ग सत्र न्यायाधीश एन. बी. बारी यांनी दिला.  

हडपसरमधील घराची झडती  

गुन्हे शाखेने प्रांजल खेवलकर यांच्या हडपसर येथील घराची सुमारे तासभर झडती घेतली. घरातून पोलिसांनी लॅपटॉप, पेनड्राइव्ह व अन्य साहित्य जप्त केले.  याशिवाय आरोपींचे ब्लड सॅम्पलदेखील घेतले असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबला ते पाठवल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.

Web Title: action taken against rave party in pune 7 arrested including eknath khadse son in law pranjal khewalkar who husband of ncp sp group leader rohini khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.