"या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका", असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:12 IST2025-04-24T17:12:11+5:302025-04-24T17:12:48+5:30
कलमा वाचून दाखवा अस ते म्हणत होते, त्यांचा राग होता का कुठल्या हेतूने त्यांनी मारलं हे माहिती नाही

"या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका", असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी
पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. आज सकाळी दोन्ही कुटुंबियांकडून संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळेने माध्यमांशी संवाद साधला. या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे. कुणालाही सोडू नका अशी मागणी असावरीने केली आहे.
असावरी जगदाळे म्हणाली, काश्मीरमध्ये पहलगाममध्ये त्या उंच जागेवर आम्ही ३० मिनिट चढून तिथं गेलो होतो. जागा खूप सुंदर आहे. फोटो काढत असताना अचानक फायरिंग सुरू झाली. तेव्हा लोक पळायला लागली. आम्ही टेंटमध्ये लपलो. गणबोटे काका खाली झोपले होते. अनेक लोक लपली होती. अनेक लोकांवर फायरिंग झाली. एकजण आमच्याकडे आला. त्याने आम्हाला पकडून गोळ्या मारायला सुरुवात केली. माझ्या वडिलांना ३ गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले काकांना देखील दोन गोळ्या लागल्या. त्यांनी फक्त पुरुषानं मारलं. त्यानंतर आम्ही तिथून पळून आलो. सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली. मला तिथ चक्कर आली होती. त्यानंतर मिलिटरी पोहचली होती. सगळ्या जखमी लोकांना श्रीनगर मध्ये शिफ्ट केलं गेल होत. रात्री १२ वाजता कळलं की काही जणांचा मृत्यू झाला. आम्हाला ओळख पटविण्यासाठी नेण्यात आलं मला तेव्हा कळलं की बाबांचा आणि काकांचा मृत्यू झाला आहे.
कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडू नका
आर्मिने खूप मदत केली. माझे वडील माझ्या कुटुंबाचे आधार होते. एकमेव कमवते होते. आज मी माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार करून आले. मला हे विसरण खूप अवघड आहे. माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडीलांना गोळ्या मारल्या आहेत. हे माणस नाहीत राक्षस आहेत. ते पहाडी मधून जंगलातून अचानक आले. चारही बाजूला मृतदेह दिसत होते. ते अतिरेकी कुठून आले सांगू नाही शकणार. कारवाई झाली पाहिजे कुणालाही सोडू नका. ते ४ ते ५ लोक होते. १५ ते २० मिनिट हे सगळं सुरू होत.
लहान मुलांना आणि स्त्रियांना मारणार नाही
कलमा वाचून दाखवा अस ते म्हणत होते. त्यांचा राग होता का कुठल्या हेतूने त्यांनी मारलं हे माहिती नाही. माझे वडील म्हणत होते तुम्हाला जे हवंय ते करतो पण तरीही त्यांनी मारलं. अनेकांच्या डोक्यात गोळ्या मारल्या होत्या. ते म्हणत होते की आम्ही लहान मुलांना आणि स्त्रियांना मारणार नाही.