सिंहगड रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून भाजी विक्रेत्यांवर कारवाई; विक्रेते व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:54 IST2021-07-08T21:53:30+5:302021-07-08T21:54:11+5:30
सिंहगड रस्त्यावरील पदपथावर भाजीपाला घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नागरिक गर्दी करत आहे.

सिंहगड रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून भाजी विक्रेत्यांवर कारवाई; विक्रेते व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी
धायरी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंहगड रस्ता येथील भाजीपाला, फळ विक्रेत्यांना सायंकाळी चारनंतर रस्त्यावर विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे संतापलेल्या भाजी-विक्रेत्यांचा प्रशासनाविरुद्धचा राग अनावर झाल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले. यावेळी सिंहगड पोलिसांनाच हस्तक्षेप करून विक्रेत्यांची समजूत काढण्याची वेळ आली.
सिंहगड रस्त्यावरील पानमळा,गणेश मळा, जयदेव नगर, राजाराम पुल, फनटाईम सिनेमागृह परिसरातील पदपथावर भाजीपाला घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नागरिक गर्दी करत होते. खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी शिस्तीकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहावयास मिळत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन ग्राहकांमध्ये 'सोशल डिस्टन्स' पाळला जात नव्हता. पोलिसांनी आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वारंवार कारवाई करूनही भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यालगत भाजी विक्री करत आहे.
मात्र, याठिकाणी पुन्हा गर्दी वाढल्यामुळे अतिक्रमण विभागाने गुरुवारी पुन्हा कारवाईचा बडगा उचलला. यावेळी भाजी विक्रेते आणि महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले व शरद दबडे यांनी हस्तक्षेप करून विक्रेत्यांची समजूत काढली. सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल,पानमळा,वडगांव बुद्रुक भागात रस्त्याच्या पदपथावर अधिकृत तसेच अनधिकृत भाजी, फळ विक्रेते व्यवसाय करताना आढळुन आल्याने सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड व कर्मचाऱ्यांनी भाजी, फळ विक्रेत्यांवार कारवाई करून विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले आहे.
म्हणून केली कारवाई...
सिंहगड रस्ता परिसरात अनेक भाजी, फळ विक्रेते बेकायदेशीर रस्त्यावर आणि इतर ठिकाणी स्टॉल लावून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच सायंकाळी चार नंतर बंदी असतानाही काही भाजी विक्रेते व्यवसाय करीत असल्याने कारवाई करण्यात आली आहे.
- जयश्री काटकर, सहायक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय.