अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई ; ६८ लाख ८६ हजारांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:38 IST2021-03-11T14:13:45+5:302021-03-11T14:38:36+5:30
पाच- सहा परदेशी लोक कोकेन, ड्रग्स अशा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचे खबऱ्यामार्फत समजले होते.

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई ; ६८ लाख ८६ हजारांचा माल जप्त
पुणे: उंड्री येथे परदेशी लोक एकत्रित राहत असून ते कोकेन, ड्रग्स अशा अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ६८ लाख ८६ हजार १०० रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा माल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी मंफ्रेन्ड मंडा ( वय ३० ), अनास्टाझिया डेव्हिड ( वय २६ ), हसन कासीद ( वय ३२ ), शामीम नंदादुला ( वय ३० ), बेका हमीस फाऊमी यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या राहत्या घरातून कोकेन, मफड्रोन, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, प्लास्टिक पिशव्या, बॉटलस असा एकूण ६८ लाख ८६ हजार १०० रुपयांचा माल ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुर हिल्स सोसायटी उंड्री येथे पाच- सहा परदेशी लोक एकत्रित राहत होते. ते सर्व कोकेन, ड्रग्स अशा अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचे खबऱ्यामार्फत समजले. याची दखल घेऊन अमली पदार्थ विरोधी पथकाने सोसायटीमध्ये कारवाई केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस मनोज साळुंखे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार प्रवीण शिर्के यांच्या पथकाने सोसायटीमध्ये कारवाई केली.