'जबाबदारीने वागा', मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेचे मोहोळ; संतप्त काँग्रेसकडून जाहीर चर्चेचे आव्हान
By राजू इनामदार | Updated: May 10, 2025 16:16 IST2025-05-10T16:16:08+5:302025-05-10T16:16:59+5:30
देशात युद्धजन्य स्थिती आहे, विरोधी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत केंद्र सरकारला एकमुखी पाठिंबा दिलाय, तरीही तुम्हाला राजकारणच दिसते आहे

'जबाबदारीने वागा', मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेचे मोहोळ; संतप्त काँग्रेसकडून जाहीर चर्चेचे आव्हान
पुणे: केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना त्यांनी अतिरेकी हल्ल्यांबाबत काँग्रेस सरकार व भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार यांच्यात केलेल्या तुलनेमुळे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेचे मोहोळ उठवले. काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी तर त्यांना जाहीर चर्चेचे आव्हान देत काँग्रेसने काय काय केले ते सांगण्याची तयारीही दर्शवली.
जेव्हा मजबूत सरकार असतं अशा शिर्षकाने मोहोळ यांनी देशावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांनतर काँग्रेसने कसे काहीच केले नाही, व भाजप सरकार कसे मजबूत कारवाई करत आहे अशा अर्थाची पोस्ट टाकली. ग्राफिक डिझाईन्स चा आधार घेत तारखेनिशी केलेली ही पोस्ट काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. काँग्रेसच्या सोशल मिडिया सेलचे राज्य समन्वयक असलेल्या चैतन्य पुरंदरे यांनी त्यांना लगेचच उत्तर दिले. त्यात त्यांनी जबाबदारीने वागा किमान तुमच्या नेत्यांचे आदेश तरी पाळा असा सल्ला देत काँग्रेस कार्यकाळात झालेल्या प्रत्येक हल्ल्यानंतर कारवाई झाली होती. याचे त्यांना स्मरण करून दिले. याऐवजी तुमच्या सरकारच्या कार्यकाळात पकडलेल्या अतिरेक्यांना सोडून दिले होते. याचीही आठवण पुरंदरे यांनी करून दिली.
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनीही मोहोळ यांना टीकेचे लक्ष्य केले. देशात युद्धजन्य स्थिती आहे. सर्व विरोधी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत केंद्र सरकारला एकमुखी पाठिंबा दिला आहे. तरीही तुम्हाला राजकारणच दिसते आहे, तेही युद्धसदृश स्थिती असताना याचा खेद वाटतो असे तिवारी यांनी म्हटले आहे. तुम्हाला चांगले खरमरीत उत्तर देता येईल, तसेच तुम्ही अभ्यासात किती कच्चे आहात तेही दाखवता येईल, मात्र आम्ही नेत्यांचा आदेश मानणारे व देश महत्वाचा असे मानत असल्याने ते देत नाही, पण तुम्ही अभ्यास करायला लागा, मिळालेली माहिती तपासून घ्यायला लागा असा सल्लाही तिवारी यांनी मोहोळ यांना दिला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी तर मोहोळ यांना थेट जाहीर चर्चेचे आव्हानच दिले. तुम्ही सांगाल तिथे, सांगाल त्यावेळी व सांगाल त्या व्यासपीठावर आम्ही येतो, तुम्हीही या. या एकाच विषयावर जाहीर चर्चा करू असे शिंदे यांनी म्हटले आहे. देश दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानबरोबर लढतो आहे, तिन्ही सैन्यदलातील जवान प्राणांची बाजी लावून खिंड लढवत आहेत व इथे बसून तुम्हाला राजकीय पोस्ट कराव्याशा वाटतात यातच तुमची संस्कृती दिसते अशी टीका शिंदे यांनी केली. देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी जे काही केले ते काँग्रेसनेच केले. पाकिस्तानबरोबर तीन युद्ध जिंकली, इतकेच नव्हे तर त्या देशाचे दोन तुकडे केले तेही काँग्रेसनेच याची आठवण शिंदे यांनी करून दिली आहे. अण्वस्त्र सज्जता, दारूगोळा निर्मिती करणारे कारखाने, लष्करी आस्थापना ही सगळी काँग्रेसचीच निर्मिती असल्याचेही स्मरण शिंदे यांनी करून दिले आहे. दरम्यान खुद्द मोहोळ यांच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्येही ते नागरिकांकडून चांगलेच ट्रोल झाल्याचे दिसते आहे.
मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट