पुणे : स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी (दि. २५) सकाळी दत्तात्रय गाडे या नराधमाने २६ वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचे सांगून बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. शुक्रवारी पहाटे आरोपीला पुण्यात आणून अटक करण्यात आली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाला आरोपीच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा करून वेगळेच वळण दिले आहे. आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झाला असल्याचे सांगितल्याने या संपूर्ण प्रकरणावरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र आरोपीच्या खात्यात पोटाची भूक भागवण्यासाठी पण पैसे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपीच्या खात्यात २४९ रुपये
आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचे देखील सांगितले गेले. पोलिस तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २४९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीची एरवी दोन वेळ जेवणाची भ्रांत असताना तो कुठून पैसे देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी तपासले दोन वर्षांचे सीडीआर..
पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाइलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. त्यात कुठेही आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून न आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी त्याने केला होता बलात्काराचा प्रयत्न..
यापूर्वीदेखील एकदा आरोपी दत्तात्रय गाडे याने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. मात्र, त्यावेळी पीडितेने घाबरून केवळ चोरीची तक्रार पोलिसांना दिली. त्याचवेळी त्या पीडितेने थोडा धीर दाखवत दत्तात्रय विरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली असती तर मंगळवारी घडलेली घटना कदाचित घडलीच नसती.