Accident: जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीचा अपघात; ट्रकची कारला जोरदार धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:39 IST2022-01-24T13:37:52+5:302022-01-24T13:39:48+5:30
तीन जण गंभीर जखमी तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत

Accident: जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीचा अपघात; ट्रकची कारला जोरदार धडक
सुपे : अहमदनगर येथील खडकी येथून जेजुरीच्या दर्शनासाठी निघालेल्या चारचाकीला मालवाहतुक दहा चाकी ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला आहे. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी ( दि. २४ ) सकाळी साडेसातच्या दरम्यान सुपे मोरगाव रस्त्यावरील डायमंड ढाब्यानजीक घडली.
या अपघातात चारचाकीतील नवनाथ रोकडे, बाबासाहेब वाडेकर आणि स्वाती रोकडे हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती चारचाकीतील महेश काळे यांनी दिली.
दोन चारचाकी गाड्या अहमदनगरहुन जेजुरी येथील खंडोबा दर्शनासाठी निघाल्या होत्या. दरम्यान सुपे येथील डायमंड ढाब्यावर चहासाठी थांबल्या होत्या. गाडीतील सर्व चहा पिऊन झाल्यावर पुन्हा गाडीत बसताना चौफुला बाजूने जोरात आलेल्या ट्रकने डायमंड जवळ थांबलेल्या एका गाडीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की ती गाडी रस्ता ओलांडून दोनशे मिटरवर जाऊन थांबली. यावेळी गाडीत बसलेले तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना सुपे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन चौफुला येथील साई दर्शन हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र तीन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती जखमी महेश काळे यांनी दिली.