Pimpri Chinchwad | कुत्र्याला शिवीगाळ करणे पडले महागात; गैरसमजातून कोयत्याने वार
By नारायण बडगुजर | Updated: April 27, 2023 13:53 IST2023-04-27T13:52:40+5:302023-04-27T13:53:06+5:30
पिंपरी मार्केट येथे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली...

Pimpri Chinchwad | कुत्र्याला शिवीगाळ करणे पडले महागात; गैरसमजातून कोयत्याने वार
पिंपरी :कुत्रा अंगावर धावून आल्याने तरुण भयभीत झाला. त्यामुळे तरुणाने कुत्र्याला शिवीगाळ केली. मात्र, ती शिवीगाळ आपल्यालाच केली असल्याच्या गैरसमजातून एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. पिंपरी मार्केट येथे मंगळवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
प्रवीण राजू शिरठाणे (वय २२, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २६) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २५ ते ३० वर्षीय अनोळखी इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी चालत पिंपरी मार्केट येथे जात होते. त्यावेळी एक कुत्रा फिर्यादीच्या अंगावर धावून आला. त्यामुळे फिर्यादीने कुत्र्यास शिवीगाळ केली. त्यावेळी तेथे असलेल्या आरोपीचा गैरसमज झाला. फिर्यादी आपल्यालाच शिवीगाळ करत आहे, असा गैरसमज आरोपीचा झाला. त्यातून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली.
तसेच तो फिर्यादीसोबत भांडू लागला. फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने फिर्यादीवर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे तपास करीत आहेत.