पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन गेला. हा प्रकार १२ ते २३ डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत पीडित मुलीच्या नऱ्हे येथील घरी घडला आहे. याप्रकरणी बारामती तालुक्यातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सचिन पंडित जाधव (३३, रा. तरडवली, मोरगाव ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. १२ ते २३ डिसेंबर या कालावधीत शिवीगाळ व मारहाण करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित तरुणीच्या घरातील ७५ हजार रुपयांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये असा १ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लाड करत आहेत.