भोर –पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द (ता. भोर) गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्क रिसॉर्टमध्ये झिपलाइनिंग करताना ३० फूट उंचीवरून कोसळून एका २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. तरल अरूण आटपाळकर (रा. सेलेशिया पार्क, न-हे, धायरी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.या प्रकरणी तरलचे वडील नंदकिशोर श्रीपती आटपाळकर (वय ५०) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.अधिकच्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी तरल आटपाळकर आपल्या कुटुंबियांसह राजगड वॉटर पार्कमध्ये गेली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती झिपलाइनिंग करत असताना सुरक्षा दोर योग्यरीत्या रेलिंगला न लावता ती लोखंडी स्टुलवर उभी राहिली. परंतु स्टुल हलल्याने तिचा तोल गेला आणि ती साइडच्या रेलिंगवर आदळून थेट ३० फूट खाली कोसळली. तिला तत्काळ नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या घटनेनंतर वॉटर पार्कमधील सुरक्षेची अक्षम्य निष्काळजीपणा समोर आला असून, स्थानिकांनी वॉटर पार्कच्या मालकावर आणि चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे वॉटर पार्कसारख्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था आणि देखरेखीची गरज अधोरेखित झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:17 IST