बारामती | कामावरून घरी परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:23 IST2022-07-16T13:13:15+5:302022-07-16T13:23:59+5:30
डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू

बारामती | कामावरून घरी परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू
सांगवी (बारामती) : कामावरून घरी परताना तरुणावर काळाने घाला घातल्याचा हृदयद्रावक प्रकार घडून आला. सांगवी- शिरश्णे मार्गावर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाचा छोटा हत्ती टेम्पोला समोरून जोरात धडक बसली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी (दि.१५) दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान सांगवी हद्दीत महादेव पुलाजवळ ही घटना घडली. याबाबत शासकीय रुई ग्रामीण रुग्णालयामार्फत तालुका पोलीस ठाण्यात मयत दाखल केले आहे. अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसून मृत गणेशचे नातेवाईक यांना संपर्क साधला असून ते आल्यानंतर संबंधित वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
गणेश विठ्ठल बनकर (वय ३३, रा. माळेवाडी लाटे, ता.बारामती ) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकी क्रमांक (एम. एच. ४२ एबी. ९४१४) वरून गणेश जात होता. समोरून दोन गाई घेऊन येणारा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक (एमएच ४२ एक्यू ४०८२) शिरश्णे वरून सांगवीच्या दिशेने येत होता. यात दुचाकीस्वार व टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वाराला डोक्याला जबर मार लागून तो मरण पावला.
दुचाकीस्वार अस्थाव्यस्थ अवस्थेत रस्त्यावर पडला होता. अपघातात त्याच्या शरीराचे विविध अवयव रस्त्यावर पडल्याने हा हृदयद्रावक प्रकार बघून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांनी गणेश बनकर यास शासकीय रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले.