गाडी साईडला घेतल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना
By नितीश गोवंडे | Updated: January 12, 2024 15:02 IST2024-01-12T15:02:14+5:302024-01-12T15:02:53+5:30
याप्रकरणी सहा ते सात जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

गाडी साईडला घेतल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना
पुणे : गाडी साईडला का घेतली असे म्हणत तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच पोलिसांकडे तक्रार केली तर चिठ्ठीत नाव लिहून आत्महत्या करण्याची धमकी दिली. हा प्रकार पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी बुद्रुक येथील एका हॉटेलसमोर घडला आहे. याप्रकरणी सहा ते सात जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कुणाल कल्याणराव शितोळे (३५, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून किरण फडतरे (रा. फुरसुंगी), सचिन चोरघडे, सागर उर्फ नाना चोरघडे व त्यांच्या इतर चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ डिसेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल शितोळे हे त्यांच्या मित्र अविनाश मोरे याच्यासोबत चारचाकी गाडीतून पुण्याहून पाटस कडे जात होते. मांजरी बुद्रुक येथील कावेरी हॉटेल समोर शितोळे यांनी गाडी रस्त्याच्या कडेला इंडिकेटर लावून उभी केली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या किरण फडतरे याने ‘तु अचानक गाडी साईडला का घेतली’ असे म्हणून फिर्यादी शितोळे यांच्यासोबत वाद घातला. तसेच शितोळे यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
यानंतर किरण फडतरे याने इतर आरोपींना बोलवून घेत शितोळे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. तसेच शितोळे यांच्या गाडीवर गाडीवर दगड मारून गाडीची तोडफोड केली. यानंतर किरण फडतरे याने ‘तु जर माझ्याविरुद्ध तक्रार केली तर मी तुझ्या विरुद्ध चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे करत आहेत.