Pune Crime: गुंडांच्या धमकीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पुणे शहरातील घटना
By नितीश गोवंडे | Updated: May 6, 2024 16:44 IST2024-05-06T16:42:38+5:302024-05-06T16:44:30+5:30
गेल्या वर्षभरापासून आरोपी जीवे मारण्याची धमकी देऊन सिद्धार्थला मारहाण करत होते...

Pune Crime: गुंडांच्या धमकीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पुणे शहरातील घटना
पुणे : गुंडांच्या धमकीमुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार पेठेत भीमनगर परिसरात घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ विजय फडतरे (१७, रा. शंकर मंदिरामागे, भीमनगर, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी सराईत गुन्हेगार रोमियो कांबळे (२७) आणि संकेत कांबळे (२४ दोघे रा. भीमनगर, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. याबाबत सिद्धार्थची आई अनिता (४०) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रोमियो आणि संकेत भीमनगर परिसरात राहायला आहेत. दोघांविरुद्ध मारामारीचे गुन्हे दाखल आहे.
गेल्या वर्षभरापासून आरोपी सिद्धार्थ याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला मारहाण करत होते. प्रतिस्पर्धी टोळीतील मुलांबरोबर राहू नको, अशी धमकी आरोपींनी त्याला दिली होती. त्यांच्या मारहाणीमुळे तो घाबरला होता. आरोपी रोमियो आणि संकेत यांनी ३० मे रोजी रात्री सिद्धार्थला मंगळवार पेठेतील नागझरी नाल्याजवळ नेले. तेथे त्याला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या मारहाणीमुळे घाबरलेल्या सिद्धार्थने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.