क्रिकेट खेळताना अंगावर वीज पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, पुरंदर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 14:22 IST2024-04-17T14:22:34+5:302024-04-17T14:22:56+5:30
अचानकपणे ढगाळ वातावरण तयार होऊन वारा व विजांचा कडकडाट वाढला...

क्रिकेट खेळताना अंगावर वीज पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, पुरंदर तालुक्यातील घटना
गराडे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे दुपारी चारच्या दरम्यान अचानकपणे ढगाळ वातावरण तयार होऊन वारा व विजांचा कडकडाट वाढला. यामध्ये शुभम सोमनाथ चौधरी (वय १७ ) याच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
पठारवाडी (ता. पुरंदर) येथील गट नंबर ११८ मध्ये मुले क्रिकेट खेळत असताना शुभम चौधरी हा गोलंदाजी करत असल्यामुळे त्याने पायातील चप्पल बाजूला काढून ठेवली होती. तर अचानकपणे वीज पडल्यामुळे शुभमला ८ ते १० फूट लांब उचलून फेकले गेले. दुर्दैवाने यामध्ये शुभमचा मृत्यू झाला. तर एक जण किरकोळ जखमी आहे. इतर आठ ते दहा मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. पुरंदर तहसील कार्यालयातील महसूल विभागाकडून मंडलाधिकारी राजाराम भामे यांनी पंचनाम्याची कारवाई सुरू केली असून पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.