पुणे: महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम करत असताना, सिमेंट पाइपवर पडलेली माती काढण्यासाठी खड्ड्यात उतरलेल्या एका कामगाराचा अंगावर माती पडून मृत्यू झाला. शंकरप्पा वाचप्पा राठोड (३७, रा. मांगडेवाडी,कात्रज) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, नियमानुसार कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याने एन्विरो कंट्रोल प्रा. लि. मालक, दामू होबन्ना राठोड (५६), एम. डी. अन्जारूल (२५), पोमान्ना मोवनीश पवार (२५ रा. मांगडेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकाण्णा राठोड (४५, रा. कात्रज) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास महापालिकेच्या एचटीपी साईटवर घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरप्पा हा बालेवाडीतील महापालिकेच्या एचटीपी साईटवर कामाला होता. २६ मार्च रोजी काम करत असताना, संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही साधने पुरवली नव्हती. त्यामुळे झालेल्या अपघातात शंकरप्पाचा जीव गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल केकाण करत आहेत.