दारू मागितल्याने दगडाने ठेचून महिलेचा केला खून; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 10:45 IST2023-01-04T10:44:56+5:302023-01-04T10:45:21+5:30
कोंढव्यातील घटना : एकाला अटक...

दारू मागितल्याने दगडाने ठेचून महिलेचा केला खून; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : कोंढव्यातील मेयफेर इलिगंझा सोसायटीच्या समोरील रिकाम्या प्लॉटमध्ये विवस्त्र अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा लावण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. त्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सैद आसिफ शेख (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) याला अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या महिलेची अद्याप ओळख पटू शकली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेयफेर इलिगंझा सोसायटीच्या समोर असणाऱ्या साई मंदिरालगतच्या रिकाम्या प्लॉटमध्ये बोरीच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटू नये, म्हणून तिच्या चेहरा विद्रुप करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना शिवनेरीनगर येथील दोघा मुलांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कोंढव्यातील झाडीमध्ये पाइपावर बसून ते दोघे जण बीअर पीत असताना ही महिला या दोघांजवळ आली. तिने दारू द्या, असे म्हणून त्यांच्याशी वाद घालू लागली. त्याचा राग आल्याने या मुलांनी धक्का दिल्याने ती पडली. तेथे असलेल्या दगडाने त्यांनी तिला मारले. तिचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने ते पळून गेले होते. ही कामगिरी गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.