नाकाबंदीत महिला पोलिसाला कारने उडवले; दारूच्या नशेतील कार चालक गेला पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:50 IST2024-12-10T09:49:36+5:302024-12-10T09:50:21+5:30
ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करण्यासाठी महिला कर्मचारी पुढे गेल्या असता चालकाने अचानक कार पुढे घेऊन त्यांना धडक दिली

नाकाबंदीत महिला पोलिसाला कारने उडवले; दारूच्या नशेतील कार चालक गेला पळून
पुणे : शहरात मद्यपी वाहनचालकांविरोधात पुणे पोलिसांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम सुरू केली आहे. या नाकाबंदीदरम्यान भरधाव कार चालकाने बंदोबस्तावर असलेल्या महिलापोलिस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केले. दीपमाला राजू नायर असे जखमी झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि. ९) मध्यरात्री दीडच्या सुमारास आरटीओ कार्यालयाजवळ घडली. दारूच्या नशेतील कार चालक पळून गेला आहे.
आरटीओ कार्यालयाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी मिल्स रोडवरून कारचालक वेगाने कार चालवत आला. बंदोबस्तावरील महिला कर्मचाऱ्याने संबंधित चालकाला थांबण्याचा इशारा केला. तेव्हा चालकाने थांबल्यासारखे केले. चालकाची ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करण्यासाठी महिला कर्मचारी नायर पुढे गेल्या. त्यावेळी चालकाने अचानक कार पुढे घेऊन नायर यांना धडक दिली, त्यानंतर त्याने बॅरिकेडला धडक देऊन तेथून पळून गेला. पोलिसांना गाडीचा नंबर मिळाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.