Pune News: पुण्यात रस्त्यावरून चाललेल्या रिक्षावरच कोसळले झाड, तिघे जखमी
By नितीश गोवंडे | Updated: October 7, 2023 15:06 IST2023-10-07T15:05:33+5:302023-10-07T15:06:14+5:30
अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढत ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले...

Pune News: पुण्यात रस्त्यावरून चाललेल्या रिक्षावरच कोसळले झाड, तिघे जखमी
पुणे :कोथरूड परिसरातील पौड फाट्याजवळ असलेल्या दशभुजा गणपती मंदिरजवळून जाणाऱ्या रिक्षावर झाड कोसळल्याने तीन जण जखमी झाले. सुदैवाने या घटनेत तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या. दरम्यान या घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढत ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजून १५ मिनीटांनी घडली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दशभुजा गणती मंदिराजवळील कॅनॉल रोडवरून एक रिक्षा (एमएच १२ एनडब्ल्यू ४४७५) जात होती. त्याचवेळी एक गुलमोहराचे झाड उन्मळून रिक्षावर पडले. दरम्यान त्याचवेळी एक दुचाकीस्वार देखील त्याच मार्गाने जात होता, मात्र सुदैवाने तो वाचला. झाड रिक्षावर पडल्याने त्यातील प्रवाशी रिक्षातच अडकले होते. कोथरूड येथील अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रिक्षात अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढले. त्यानंतर झाडाच्या फांद्या बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला.