डेंग्यूच्या साथींबाबत अंदाज देणारी प्रणाली विकसित..!

By श्रीकिशन काळे | Updated: January 23, 2025 17:48 IST2025-01-23T17:48:41+5:302025-01-23T17:48:59+5:30

आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवामान वैज्ञानिक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल; संशोधन प्रसिद्ध

A system developed to predict dengue outbreaks..! | डेंग्यूच्या साथींबाबत अंदाज देणारी प्रणाली विकसित..!

डेंग्यूच्या साथींबाबत अंदाज देणारी प्रणाली विकसित..!

पुणे : हवामानातील बदल आणि तापमानात होणारी वाढ ही डेंग्यू पसरवणाऱ्या डासांसाठी पोषक ठरत आहे. अभ्यासातील निष्कर्षानुसार २७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, कमी वेळेत अधिक पाऊस पडणे आणि जून ते सप्टेंबर या दरम्यान ६० टक्के आर्द्रता असणे या परिस्थितीत डेंग्यू डोके वर काढतो, असे आमचे निरीक्षण आहे. यानुसार डेंग्यूविषयी पूर्वअंदाज देण्याची प्रणाली आम्ही विकसित केली आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय दर्जाचे हवामान वैज्ञानिक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केले.

भवताल फाऊंडेशन, आयसर-पुणे, अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संशोधन प्रोग्रॅम (WCRP) यांच्या संयुक्त विद्यमाने आयसर (पुणे) येथे दोन दिवस 'हवामान बदल जाणून घेताना' या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत आयसर-पुणे येथील डॉ. जॉय मॉन्टेरो, प्रा. छावी माथूर, प्रा. बीजॉय थॉमस, 'आयआयटीएम'मधील संशोधक आदिती मोदी, राज्य सरकारच्या 'स्मार्ट' प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देशमुख, पर्यावरण अभ्यासक आणि 'भवताल फाउंडेशन'चे संस्थापक अभिजित घोरपडे, 'भवताल फाऊंडेशन'चे समन्वयक वैभव जगताप यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. कोल म्हणाले की, वाढते तापमान आणि चढ-उताराच्या मान्सूनमुळे डेंग्यू वाढत आहे. डेंग्यू-संबंधित मृत्यू भविष्यात वाढू शकतात, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मान्सूनच्या पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित आहे. अतिवृष्टीमुळे डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतात; परंतु विकसित केलेले मॉडेल दर्शविते की, उष्ण दिवसांमध्ये होणारी डासांची वाढ डेंग्यूच्या भविष्यातील बदलांवर प्रभाव टाकते. कार्बन उत्सर्जनांतर्गत पुण्यात सरासरी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच भारतातील तापमान आणि आर्द्रता भविष्यात आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

उदय देशमुख म्हणाले की, कृषी ही एक मूल्यसाखळी आहे. साधारणपणे ३० वर्षांपूर्वी आम्ही धुळपेरणीनंतर पिकाच्या उत्पादनात वाढ होते, असे छातीठोकपणे सांगत होतो. आता किमान १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करावे लागते. हवामान बदलाचे हे दृश्य परिणाम आहेत. सध्या महाराष्ट्रात २७०० हवामान केंद्रे आहेत. दर दहा किलोमीटरमधील पावसाचे अपडेट मिळतात. तरीही मोजणीमध्ये भिन्नता आढळते, हे सत्य नाकारून चालणार नाही. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी शासन पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि एकंदरीत सरकारी योजनांबाबत देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रा. बीजॉय थॉमस म्हणाले, हवा, जमीन आणि समुद्राच्या पाण्याचेही तापमान वाढत असल्याने नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. पाऊस सरासरी एवढा पडत असला तरी कमीत कमी वेळात अतिवृष्टी, ढगफुटी होत आहे. महापूर येत आहेत. उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत.

Web Title: A system developed to predict dengue outbreaks..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.