शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

By नितीन चौधरी | Updated: April 5, 2025 16:26 IST2025-04-05T16:25:32+5:302025-04-05T16:26:04+5:30

वाळू धोरण, देवस्थान जमिनी, भोगवटा दोनच्या जमिनी एक करणे, स्वामित्व योजना, पाणंद रस्ते अशा पद्धतीची कामे केली जाणार

A soldier became the owner of a 50-acre farm because he did not have access to roads, water, and electricity. | शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर येत्या काळात एकही आत्महत्या होणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : भविष्यात शेतकऱ्यांना रस्ते, पाणी आणि वीज मिळाली पाहिजे. या गोष्टी मिळत नसल्यानेच ५० एकरचा मालक असलेला शेतकरी हा शिपायाचे काम करतो. जर शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर पुढच्या काळात एकही आत्महत्या होणार नाही, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. राज्य सरकार नव्याने काही योजना आणत आहे.

यामध्ये वाळू धोरण, देवस्थान जमिनी, भोगवटा दोनच्या जमिनी एक करणे, स्वामित्व योजना, पाणंद रस्ते अशा पद्धतीची कामे केली जाणार आहेत. यासाठी ही कामे करताना अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. कोणावरही कारवाई करताना आनंद होत नाही. मात्र, खूप चुकीच्या पद्धतीने काम केले तर त्याच्यावर कारवाई होणार असा इशाराही त्यांनी दिला.

बालेवाडीतील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित महसूल परिषदेत ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी उपस्थित होते.

राज्याचा कारभार पारदर्शी आणि गतिमान करण्याचे काम महसूल विभागच करू शकतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल असे काम महसूल विभागाने करावे. पुढील दोन वर्षांत एकाही व्यक्तीची सुनावणी बाकी राहता कामा नये, असे काम करून महसूल विभागाचा देशात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली. महसूल विभागाने लोकाभिमुख निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कामात आधुनिकीकरण आणि एआयचा वापर झाला तर महसूल विभाग अधिक चांगले काम करत आहे, हे लक्षात येईल.

सरकारची प्रतिमा चांगली करण्यात आणि पारदर्शी व गतिशील सरकार करण्यामध्ये महसूल विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले. सामान्यांची कामे स्थानिक पातळीवरच झाली पाहिजेत, यासाठी दोन वर्षांत एकही सुनावणी बाकी राहता कामा नये, असा संकल्प या कार्यशाळेच्या माध्यमातून करावा, अशी अपेक्षाही यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केली. इतर राज्यांमध्ये काय चालले आहे याचा देखील अभ्यास करावा, असेही त्यांनी सुचविले.

उसनवारी पद्धत बंद करणार

महसूल विभागातील लोक हे इतर विभागांमध्ये घेऊन जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे महसूल विभागातील कामकाजावर अधिक ताण पडतो. यापुढे असे होणार नाही. इतर ठिकाणी पाठवलेल्या लोकांना पुन्हा महसूल विभागामध्ये आणण्याचे काम पुढील काळामध्ये होऊन आस्थापना अधिक सशक्त केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. अधिकाऱ्यांनी चुकीचे काम अजिबात करू नका. नियमाबाहेर काम असेल तर होणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यक्रमावेळी भूमी अभिलेख बोधचिन्हाचे उद्घाटन करण्यात आले. त्याबरोबरच इप्सित, तीस भू-प्रणाम केंद्र, ई-मोजणी व्हर्जन टू आणि महा खनिज ऑटो या प्रकल्पांचेही उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आभार मानले.

Web Title: A soldier became the owner of a 50-acre farm because he did not have access to roads, water, and electricity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.