प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवत सराफी व्यावसायिकाला साडे आठ लाखांचा गंडा
By नम्रता फडणीस | Updated: February 27, 2024 19:03 IST2024-02-27T18:53:41+5:302024-02-27T19:03:48+5:30
प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवून २५० ग्रॅम २५० मिली सोन्याच्या वस्तू उधारीवर घेत धनादेश दिला

प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवत सराफी व्यावसायिकाला साडे आठ लाखांचा गंडा
पुणे: प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवत दुकानातून ८ लाख ५० हजार ५९९ रुपयांचे सोने उधारीवर नेत सराफी व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी सागर राधेश्याम वर्मा (वय ४३, रा. काळेपडळ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ नारायण इंगळे (रा. ओव्हळे, ता. मावळ), अमोल माणिक नेमाने (रा. मांजरी), सचिन आऐटे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ आणि १२ नोव्हेंबर २०२३ रोजी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर वर्मा यांचे महादेव नगर येथे गणराज ज्वेलर्स नावाने दुकान आहे. आरोपी हे महागडे कपडे, वाहने घेऊन गणराज ज्वेलर्समध्ये आले. यावेळी आरोपीनी फिर्यादी यांना प्रतिष्ठित नागरिक असल्याचे भासवून २५० ग्रॅम २५० मिली सोन्याच्या वस्तू उधारीवर घेत धनादेश दिला. यानंतर फिर्यादी यांनी धनादेश बँकेत भरला मात्र तो वटला नाही. यानंतर फिर्यादी यांनी आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. यामुळे आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डोंगरे करत आहेत.