ए. पी. जे. कलाम खऱ्या अर्थाने पीपल्स प्रेसिडेंट- डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:18 AM2023-01-31T10:18:16+5:302023-01-31T10:20:02+5:30

प्राचार्य डॉ. छाया महाजन लिखित पुस्तकाचे प्रकाशन...

A. P. J. Kalam is truly People's President-Dr. Raghunath Mashelkar | ए. पी. जे. कलाम खऱ्या अर्थाने पीपल्स प्रेसिडेंट- डॉ. रघुनाथ माशेलकर

ए. पी. जे. कलाम खऱ्या अर्थाने पीपल्स प्रेसिडेंट- डॉ. रघुनाथ माशेलकर

googlenewsNext

पुणे : वेगवेगळ्या खिडक्यांमधून पाहताना जग वेगवेगळे दिसते; पण सगळ्या खिडक्यांतून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाची पूर्णपणे ओळख होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे अतिशय संवेदशील, सहृदय, शालीन, विनम्र असे व्यक्तिमत्त्व होते. लहान मुलांविषयी त्यांना विशेष कौतुक होते, युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता होती, ते खऱ्या अर्थाने ‘पीपल्स प्रेसिडेंट’ होते, असे गौरवोद्गार डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

प्राचार्य डॉ. छाया महाजन यांनी डॉ. कलाम यांच्याविषयी पुस्तक लिहून मोठे समाजकार्य केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा भावी पिढीला उपयुक्त आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

माजी प्राचार्य डॉ. छाया महाजन यांचे चाळीसावे पुस्तक असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन साेमवारी झाले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साकेत प्रकाशनचे साकेत भांड व्यासपीठावर होते.

डॉ. माशेलकर म्हणाले की, आपण कधी, कुठे, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते; परंतु आयुष्यात पुढे कोण व्हायचे हे मात्र आपल्या हातात नक्की असते. हे पुस्तक आवडल्याने मी पुस्तकाची प्रस्तावना आनंदाने लिहिली आहे. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. कलाम यांच्या चरित्रचिंतनाबरोबरच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर येते. हिमालयासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जनसामान्यांसमोर आणणे हे लेखकाचे कर्तव्य आहे.

डॉ. छाया महाजन म्हणाल्या, वाचकांनी साहित्यकृती स्वीकारल्यामुळे चाळीस पुस्तकांच्या लेखनापर्यंत प्रवास करता आला आहे. कोणासारखे दिसावे, असावे, लिहावे यात अडकायचे नाही हे मनात पक्के ठरवून लेखन प्रवास केल्याने सर्जनशीलतेला वाव मिळून माझ्या हातून सहजतेने लिखाण घडले.

मान्यवरांचे स्वागत डॉ. चेतन महाजन, डॉ. अमित महाजन, प्रतिमा भांड, गौरी महाजन, ज्योती नांदेडकर यांनी केले. प्रास्ताविक प्रतिमा भांड, तर सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले.

Web Title: A. P. J. Kalam is truly People's President-Dr. Raghunath Mashelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.