बारामती: वालचंदनगर या धावत्या एस टी बसमध्ये माथेफिरू तरुणाने अचानक कोयत्याने एका प्रवाशी तरुणावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मानसिक आजारी असललेल्या युवकाने केलेले कृत्य प्रवाशी महिलेच्या जीवावर बेतले आहे. कोयता हल्ल्याने भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी पळताना प्रवाशी महिला रस्त्यावर पडुन गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा पुणे शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला.
वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती)असे या प्रवाशी महिलेचे नाव आहे. काटेवाडी (ता. बारामती) येथे दि ३ ऑगस्ट रोजी बारामती वालचंद नगर बस मधून वर्षा भोसले या वालचंदनगर या त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या. या बस मध्ये मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर(वय २१, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने अचानक शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही प्रवाशांनी चालू बस मधून मागच्या बाजूने उड्या मारल्या. प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने बस काठेवाडी येथील उड्डाणपुलावर थांबवली. यावेळी पवन गायकवाड हा देखील जीव वाचवण्यासाठी पळाला, दरम्यान वर्षा भोसले यादेखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाल्या. त्याचवेळी त्या रस्त्यावर जोरदार कोसळल्याने त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्त्राव होवून त्या जखमी झाल्या. त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलग पाच दिवस सुरु असणारी त्यांची मृत्यूशी झुंज बुधवारी संपली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वानेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रा. रामचंद्र भोसले यांच्या त्या पत्नी होत, वर्षा भोसले यांच्या मृत्यु पश्चात पती , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मूळ काटी(ता.इंदापुर) येथील रहिवासी असलेले भोसले कुटुंब बारामतीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे.