किरण शिंदे
पुणे: स्वारगेट बसस्थानक परिसरात प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर पुण्यातून आणखी असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीच्या वर्गातील मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले. पुण्याजवळील वाघोलीत सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वाघोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून २७ वर्षीय नराधम तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुटुंबीयांसह राहते. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. पीडित मुलगी ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर पिठाची गिरणी आहे. आरोपी तरुण या पिठाच्या गिरणीत कामाला आहे. दरम्यान रोज ही मुलगी याच रस्त्याने शाळेत ये जा करत होती. हे आरोपी तरुणाला चांगलेच माहीत होते. आज सकाळी जेव्हा ती शाळेत जाण्यासाठी निघाली तेव्हा आरोपीने तिला अडवले. खाऊ देण्याचं अमिष दाखवलं आणि काम करत असलेल्या गिरण परिसरातील घेऊन गेला आणि लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान काही वेळानंतर बाहेर आलेली ही शाळकरी मुलगी रस्त्यावर उभे राहून रडत होती. सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेल्या काही लोकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. रडत असलेल्या या मुलीला शांत केले आणि तिच्याकडे विचारणा केली असता तिने हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या सर्व प्रकार सांगितला. तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी तरुणाला गिरणीतून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. वाघोली पोलीस अधिक तपास करत आहेत.