दोन विरोधक माजी आमदारांमधील मित्रत्वाचे नाते; सध्याच्या राजकारणात हे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारं
By भालचंद्र सुपेकर | Updated: June 18, 2023 15:45 IST2023-06-18T15:45:44+5:302023-06-18T15:45:55+5:30
जेव्हा विरोधकही मित्र असायचे, असे ते दिवस पाहायला मिळणे आजच्या काळात अशक्यच

दोन विरोधक माजी आमदारांमधील मित्रत्वाचे नाते; सध्याच्या राजकारणात हे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारं
पुणेः विचारांची लढाई असलेल्या राजकारणात वैयक्तिक शत्रुत्व अपेक्षित नाही, हा संदेश अधोरेखित करणारी अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत सापडतात. मावळ मतदारसंघातील कृष्णराव भेगडे आणि दिवंगत बी. एस. गाडेपाटील या दोन माजी आमदारांमधलं नातंही तसंच होतं. राजकीय विरोधक म्हणजे जीवाचा दुश्मन, अशी संस्कृती वेगाने पसरत असल्याच्या या काळात हे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारं आहे, अशी आठवण या दोघांचेही नातलग असलेल्या नंदकुमार शेलार यांनी सांगितली. भेगडे आणि गाडे या दोन माजी आमदारांमधील मित्रत्वाचे नाते शेलार यांनी ‘लोकमत’शी बोलताना उलगडले.
शेलार यांनी सांगितले की, कृष्णराव भेगडे हे मावळमधील अजातशत्रू व्यक्तिमत्व. ते मावळ मतदारसंघातून १९७२ आणि १९७८ ला विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवरही संधी दिली. त्यांना १९८० च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
कृष्णराव भेगडे हे मूळ जनसंघाचे. त्यांनी १९७६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७७ च्या आणीबाणीनंतर मूळ काँग्रेसमधून इंदिरा काँग्रेस आणि राज्यात शरद पवारांची समाजवादी काँग्रेस असे पक्ष स्थापन झाले. त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसची लाट होती. भेगडे यांनी शरद पवारांच्या काँग्रेसमधून निवडणूक लढवली. मावळ मतदारसंघात भेगडे यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांचा इतका दबदबा होता की त्यांच्या विरोधात कोणी उमेदवार मिळत नव्हता. तेव्हा इंदिरा काँग्रेसकडून अँड बी. एस. गाडेपाटील त्यांच्या विरोधात उभे राहिले. गाडे पाटील पंजाच्या चिन्हावर अवघ्या १५३२ मतांनी निवडून आले.
विजयी सभेबाबतची आठवण सांगताना शेलार यांनी सांगितले की, त्या काळात मतमोजणी होऊन विजयी उमेदवाराची घोषणा झाली की लगेच विजयी सभा घेतल्या जात. तशी अँड बी. एस. गाडे पाटील यांची विजयी सभा लोणावळ्यात होती. त्या विजयी सभेत तत्कालीन पराभूत उमेदवार कृष्णराव भेगडे गेले. त्यांनी व्यासपीठावर जाऊन अँड. बी.एस. पाटील यांचे अभिनंदन केले. त्या सभेत कृष्णराव म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी ज्या ज्या प्रकारची मदत लागेल त्यासाठी मी गाडेपाटील यांच्या सोबत कायम ठामपणे उभा राहीन. जेव्हा विरोधकही मित्र असायचे, असे ते दिवस पाहायला मिळणे आजच्या काळात अशक्यच, असे मतही शेलार यांनी व्यक्त केले.