अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; साडेचार हजार नागरिकांकडून तब्बल ३६ लाखांचा दंड वसूल
By राजू हिंगे | Updated: January 22, 2025 19:02 IST2025-01-22T19:01:22+5:302025-01-22T19:02:08+5:30
या कारवाईत ४ हजार ५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल

अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; साडेचार हजार नागरिकांकडून तब्बल ३६ लाखांचा दंड वसूल
पुणे : शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे. महापालिकेकडून १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ४ हजार ५१९ नागरिकांकडून तब्बल ३६ लाख ३४ हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिकेकडून यापूर्वी शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दैनंदिन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात प्रभावी कारवाई होत नव्हती. त्यामुळे महापालिकेने इंदोर महापालिकेच्या धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयस्तरावर गस्त पथकांची निर्मिती करून त्यांना स्वतंंत्र वाहने दिली आहेत. अशी १५ पथके असून, त्यासोबतच आणखी तीन पथके परिमंडळ स्तरावर या विशेष वाहनांमधून शहरात गस्त घालतात. त्यांच्यावर शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे आणि त्यांची जनजागृती करणे एवढीच जबाबदारी देण्यात आली असल्याने शहरात प्रभावीपणे कारवाई होत असल्याचे चित्र आहे.
या कारवाईत सर्वाधिक १८ लाख २१ हजार रुपयांचा दंड सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे. याशिवाय बांधकाम राडारोडा उघडल्यावर टाकल्याप्रकरणी ५ लाख ५८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त संदीप कदम यांनी स्पष्ट केले. रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून १ लाख २६ हजार, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून ९१ हजार ७००, कचरा जाळल्याप्रकरणी ५५ हजार, बांधकामाच्या राडारोडा प्रकरणी ५ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे.