पुणे : पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नळ स्टॉप व विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्गावर कोथरूड डेपो चौकातही दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महामेट्रोकडून महापालिकेला देण्यात आला आहे. या प्रस्तावाचा अभ्यास करून महापालिका काही सुधारणा व सूचना करून त्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महामेट्रोचा वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारच्या मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेने या परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले होते. आता येथून मेट्रोही जाणार असल्याने येथे दुमजली उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव पुढे आला. केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही तशी सूचना प्रशासनाला केली होती. त्यानुसार महामेट्रोकडून या दुमजली उड्डाणपुलाचा प्राथमिक आराखडा महापालिकेच्या प्रकल्प विभागाला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी महामेट्रोने अंदाजे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.
कोथरूड डेपो चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आला आहे. या उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडी फुटून वाहतुकीला गती मिळेल. या आराखड्याचा सविस्तर अभ्यास करून त्यात आवश्यक ते बदल सुचवून सुधारित आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवला जाईल. - युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका.
असा असेल पूल
एकूण लांबी - ७१५ मीटर
रुंदी - १४ मीटर (प्रत्येकी २-२ लेन)
अंदाजे खर्च - ९० कोटी रुपये