फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल

By श्रीकिशन काळे | Updated: February 20, 2025 13:24 IST2025-02-20T13:24:15+5:302025-02-20T13:24:49+5:30

महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनात साहित्य रसिक आणि साहित्यिकांची मांदियाळी जमली

A concert of colorful stories and poems at the gathering on spinning wheels | फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल

फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल

पुणे :  फिरत्या चाकांवर रंगलेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनात कविता, गझलची मैफल, कथा-कथन, पोवाडे, गोंधळाच्या सादरीकरणाने महादजी शिंदे एक्स्प्रेसमध्ये कला-साहित्य उपक्रमांची मैफल रंगली.

दि. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला पुणे व परिसरातील अनेक साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांना दिल्लीवारी घडविणाऱ्या महादजी शिंदे एक्सप्रेसमध्येही साहित्य-कला विषयातील अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मराठी साहित्ययात्री संमेलनाचे उद्घाटन आज मराठी भाषा राज्यमंत्री उदय सामंत, डॉ. डी. वाय. पाटील अभिमित विद्यापिठाचे कुलपती आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

पुण्यातून दिल्लीला निघालेल्या महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनात साहित्य रसिक आणि साहित्यिकांची मांदियाळी जमली आहे. अभंग, भक्ती गीते, भावगीते, चित्रपट गीते यासह कथा-कविता-गझला, नावाजलेल्या साहित्यिकांच्या कविता, तर कुठे स्वरचित कविता सादर करत साहित्य प्रेमींची रेल्वे सुसाट दिल्लीच्या दिशेने निघाली आहे. रेल्वेमध्ये विविध शाळा, महाविद्यालये तसेच अनेक संस्थांमधील साहित्य रसिक साहित्याच्या दिंडीत सहभागी झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण गावातील वारकरी देखील अभंगाची दिंडी विठ्ठल नामाचा जयघोष करीत सहभागी झाले आहेत. आयएलएस विधी महाविद्यालयाच्या मराठी वादसभेेच्या सदस्यांचाही सहभाग आहे. शांती सेनेत सेवा बजावणारे माजी सैनिक आणि मांडवगण गावचे माजी सरपंच शिवाजी कदम यांनी शांती सेनेतील चित्तथरारक अनुभव ऐकविले. या सोबतच युनिक ॲकॅडमी येथून जाहीर मुलाणी यांच्यासह लक्ष्मीछाया हुले या पुणे येथून साहित्य दिंडीत सहभागी झाले आहेत. कसारा (तालुका शहापूर) येथून सहभागी झालेले देवभाऊ उबाळे यांनी त्यांच्या गावात असणाऱ्या भीषण पाणी टंचाईची दाहकता आपल्या कवितेतून सादर केली.

या संपूर्ण प्रवासादरम्यान विविध साहित्यिक आणि रसिक मनोरंजनासाठी आपापल्या साहित्य सादरीकरणात रमलेले दिसत आहेत. बहुतांश रसिकांनी आपापल्या साहित्यकृतींच्या सादरीकरणावर भर दिला आहे. स्वरचित कवितांना विशेष प्राधान्य दिले. पुण्याच्या चपराक प्रकाशनच्या माध्यमातून 64 साहित्यिक संमेलनात सहभागी झाले आहेत.  मावळ तालुका दिंडी समाजाच्या 25 वारकऱ्यांचे अखंड कीर्तन, टाळ- मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. भारत विठ्ठलदास यांचा विज्ञानातून सज्ञान करण्याच्या खेळानेही मनोरंजनात भर घातली आहे. रेल्वे प्रवासात हमखास खेळल्या जाणाऱ्या गाण्याच्या भेंड्या ऐवजी एका पाठोपाठ एक कविता सादर करणे, पुस्तकातील आवडत्या उताऱ्यांचे वाचन करणे आदी उपक्रम सादर होत आहेत.

संगीता बर्वे यांचे कविता वाचन

संगीता बर्वे यांनी अनुवादित केलेल्या ‌‘सर्जनात्मक हस्तक्षेप‌’ या पुस्तकातील कवितांचे वाचन केले. मराठी साहित्ययात्री संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदी कवी डॉक्टर केदारनाथ सिंह यांच्या निवडक पन्नास कवितांचा मराठी अनुवाद या पुस्तकात केला आहे. सुनिताराजे पवार यांच्या संस्कृती प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‌‘पाण्याची प्रार्थना‌’, ‌‘मीठ‌’, ‌‘पेरू‌’, ‌‘पावसातील स्त्री‌’ यासह अनेक कवितांचे वाचन बर्वे यांनी केले. बर्वे यांच्या कविता वाचनाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

Web Title: A concert of colorful stories and poems at the gathering on spinning wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.