'तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झालाय', सायबर चोरट्यांचा एका व्यक्तीला 32 लाखांचा गंडा
By नम्रता फडणीस | Updated: April 23, 2024 16:19 IST2024-04-23T16:18:32+5:302024-04-23T16:19:26+5:30
तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येत असल्याची भीती दाखवली

'तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झालाय', सायबर चोरट्यांचा एका व्यक्तीला 32 लाखांचा गंडा
पुणे : तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ मिळून आले आहेत. तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येत आहे. अशी भीती दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला जवळपास
32 लाखांचा सायबर् चोरट्यांनी गंडा घातला.
याप्रकरणी, बिबवेवाडी येथील 41 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. 10 ते 17 एप्रिल या कालावधीत ही घटना घडली आहे.
सायबर् चोरट्यांनी मोबाईलद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. मुंबई ते बँकॉक-थायलंड असे तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत. मुंबईच्या नार्कोटीक्स विभाग येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येणार आहे अशी भीती दाखवली. त्यामुळे फिर्यादी घाबरले त्यामुळे त्यांनी सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे माहिती दिली. पुढे चौकशी करण्याच्या बहाण्याने सर्व्हिलन्स खाते पाठवायचे असल्याचे भासवून त्याच्याकडून 31 लाख 89 हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केली.