ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर
By राजू हिंगे | Updated: March 13, 2024 13:35 IST2024-03-13T13:35:19+5:302024-03-13T13:35:45+5:30
दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून समिती सविस्तर चौकशी करून सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार

ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर
पुणे : महापालिकेतील पथ विभागाच्या उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले होते. यासंदर्भात आता दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सविस्तर चौकशी करून सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. तर संबंधित उपअभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे युवक अध्यक्ष रविराज काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघड केला होता. यानंतर विक्रम कुमार यांनी २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश पथविभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना दिले होते; परंतु पालिकेला सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे या प्रकरणाचा गोपनीय अहवाल सोमवारी सादर झाला.
पथविभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना प्राथमिक अहवाल दिला आहे. हा अहवाल अद्याप मी वाचलेला नाही; मात्र या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे; तसेच पथविभागाचे अधीक्षक अभियंता रावसाहेब दांडगे आणि ‘जायका’चे प्रकल्पप्रमुख जगदीश खानोरे यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सविस्तर चौकशी करून सात दिवसांत अहवाल देईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.