ST Strike: राज्यात '९१८' तर पुणे जिल्ह्यात '२६' कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 19:02 IST2021-11-10T19:02:13+5:302021-11-10T19:02:26+5:30
एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात

ST Strike: राज्यात '९१८' तर पुणे जिल्ह्यात '२६' कर्मचारी निलंबित
पुणे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे अशी त्यांची मागणी आहे. संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून एसटी आगारात आंदोलनालाही सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीववर महामंडळाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना तयार झाल्या असून ते संप मागे घेण्यास तयार नसल्याने एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. महामंडळाकडून राज्यात ९१८ तर पुणे जिल्ह्यात २६ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे गावी गेलेल्या लोकांना पुन्हा माघारी येण्यास खासगी वाहनांचा वापर करावा लागला. पण अशी परिस्थिती उद्भवली असतानाही खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट होऊ लागली होती. त्यामुळे अखेर महामंडळाकडून खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली. आणि त्यांनी एसटीचे दर आकारावेत अशा सूचनाही देण्यात आल्या. तरीही संप मागे घेण्यास कर्मचारी तयार झाले नाहीत.
एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका
एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरणाची मागणी पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास १२० पेक्षा जास्त डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका बसत आहे.