कुरकुंभच्या सरपंचांवर अविश्वास मंजूर, सरपंच जयश्री भागवत यांच्याविरोधात नऊ मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:27 AM2018-01-06T02:27:53+5:302018-01-06T02:28:04+5:30

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ग्रामपंचायतीमधील रणधुमाळी थांबली असून, शुक्रवारी (दि. ५) झालेल्या अविश्वास ठरावावर ९ विरुद्ध २ असे मतदान झाले. भागवत यांना त्यांच्या मतासह फक्त दोन, तर विरोधात नऊ सदस्यांनी मतदान करून पदउतार होण्यास भाग पाडले.

 9 votes against Sarpanch Jayshree Bhagwat granted disbelief on Sarpanches of Kurakumba | कुरकुंभच्या सरपंचांवर अविश्वास मंजूर, सरपंच जयश्री भागवत यांच्याविरोधात नऊ मते

कुरकुंभच्या सरपंचांवर अविश्वास मंजूर, सरपंच जयश्री भागवत यांच्याविरोधात नऊ मते

Next

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ग्रामपंचायतीमधील रणधुमाळी थांबली असून, शुक्रवारी (दि. ५) झालेल्या अविश्वास ठरावावर ९ विरुद्ध २ असे मतदान झाले. भागवत यांना त्यांच्या मतासह फक्त दोन, तर विरोधात नऊ सदस्यांनी मतदान करून पदउतार होण्यास भाग पाडले.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या या घडामोडीत कुरकुंभ येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तणावाच्या स्थितीत सह्या न केलेल्या दोन सदस्यांना अचानक हजर करून विरोधकांनी बाजी मारली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी जयश्री भागवत यांची गुप्त मतदानाची मागणी फेटाळून स्पष्ट बहुमत असणाºया ९ सदस्यांच्या बाजूने हात वर करून मतदान करण्याचा निर्णय घेत निकाल दिला.
गेल्या आठवड्यापूर्वी अविश्वास दाखल झाल्यानंतर कुरकुंभ येथे विविध राजकीय घटनांना वेग आला होता. यामध्ये विरोधकांनी सदस्यांवर कोणी प्रभाव टाकू नये, म्हणून त्यांना अज्ञातस्थळी हलविण्याचीदेखील योजना आखून सत्ताधाºयांना नामोहरम केले आहे. यामुळे साडेचार वर्षांपासून चाललेल्या प्रखर संघर्षाचा शेवट झाला आहे. परिणामी, अविश्वास ठराव अखेरच्या क्षणी का होईना; पण यशस्वी झाल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलालाची उधळण केली.
या अविश्वासाच्या प्रक्रियेत सर्वच आजी-माजी सरपंच-उपसरपंच, तसेच सदस्यांनी आपली भूमिका बजावली. यामुळे भागवत यांना एकतर्फी लढा द्यावा लागला.
दरम्यान, निवडणुकीनंतर विजेत्या गटातील महिलेला प्रत्येक वर्षीप्रमाणे सरपंचपद मिळण्याची बोलणी झाली होती; मात्र भागवत यांनी राजीनामाच न दिल्याने त्यांच्याच गटातील तारा सोमनाथ गायकवाड यांनी त्यांच्या विरोधात अगदी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी झाला. परिणामी, मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या अविश्वास ठरावात ज्या राहुल भंडलकरना आपल्याकडे खेचण्याची किमया भागवत यांनी केली, ती या वेळेस त्यांना करता आली नाही. त्यामुळे या वेळी त्यांना पदावरून खाली उतरावेच लागले.
साडेचार वर्षांपूर्वी कुरकुंभ येथील ग्रामस्थांना प्रत्येक महिन्यात नवनवीन राजकीय घडामोडी अनुभवण्यास मिळाल्या. अगदी चार नंबर वॉर्डाची फेरनिवडणूक ते एका सदस्याचे तीन अपत्यांचे प्रकरण यामुळे कधी नव्हे तो अभूतपूर्व गोंधळ या कालावधीत दिसून आला. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत गैरहजर राहण्यापासून एकही ग्रामसभा संपूर्ण संख्याबळाअभावी भरणे इथंपर्यंत सदस्यांची नाराजी सरपंचांना भोवली असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भागवत त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यास कमी पडल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.
यादरम्यान, कुरकुंभ ग्रामपंचायतीजवळ पोलीस उपनिरीक्षक भानुदास जाधव, त्यांचे सहकारी पंडित मांजरे, कचरे शिंदे, राकेश फाळके, दत्तात्रय चांदणे व अतिरिक्त पोलीस, तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली. अविश्वासाच्या ठरावादरम्यान मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे, तलाठी बापू देवकाते, ग्रामसेवक ताराचंद जगताप यांनीदेखील प्रक्रियेत सहभाग घेतला होता. अविश्वासाच्या बाजूने तारा गायकवाड, वैजयंता भोसले, वैशाली गिरमे, वंदना भागवत, रतन साळुंके, सुनीता जाधव, उपसरपंच रशीद मुलाणी, सनी सोनार व राहुल भंडलकर या ९सदस्यांनी मतदान केले, तर जयश्री भागवत यांच्या बाजूने अरुण भागवत व त्यांचे स्वत:चे अशी २ मते झाली; त्यामुळे या ठरावाचा एकतर्फी निकाल लागला.
पुढील सरपंच निवडीसाठी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने कार्यवाही केली जाईल व अल्पावधीतच पुन्हा सरपंचपदाची रस्सीखेच सुरू होईल. त्यामुळे सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे रोमहर्षक असेल. त्यातच पुढच्या निवडणुकीचेदेखील बिगूल वाजेल. यात जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे; त्यामुळे आज झालेल्या अविश्वासाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते.

अविश्वास ठराव हा सर्वानुमते होता. साडेचार वर्षांपासून कुरकुंभ येथील राजकारणात असलेली अस्वस्थता आता संपली असून, गावातील विकासाच्या दृष्टीने पुढची पावले उचलली जातील. ज्याप्रमाणे कुरकुंभ येथे प्रदूषणमुक्तीच्या लढ्याला यश आले, त्याचप्रमाणे साडेचार वर्षे होत असलेल्या दबावतंत्रातून बाहेर पडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
- राहुल भोसले
विरोधी गटप्रमुख.

गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या भक्कम विकासकामांमुळे विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे अविश्वास ठराव आणला. मागील वेळी आपण यशस्वी झालो होतो; मात्र या वेळी तसे झाले नाही. पुढील निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आपल्याला जनतेने नाकारले नाही, हे बघणे गरजेचे आहे.
- जयश्री भागवत
सरपंच कुरकुंभ

Web Title:  9 votes against Sarpanch Jayshree Bhagwat granted disbelief on Sarpanches of Kurakumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.