Pune Crime | पुरेसा नाश्ता न दिल्याने ६५ वर्षाच्या पतीने ६३ वर्षाच्या पत्नीला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:36 IST2022-05-28T17:33:56+5:302022-05-28T17:36:25+5:30
ही घटना भोसलेनगरमध्ये २० मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती...

Pune Crime | पुरेसा नाश्ता न दिल्याने ६५ वर्षाच्या पतीने ६३ वर्षाच्या पत्नीला केली मारहाण
पुणे : पुरेसा नाश्ता न दिल्याने रागाच्या भरात ६५ वर्षाच्या पतीने आपल्या ६३ वर्षाच्या पत्नीला ढकलून देऊन खाली पाडले. या वयात पडल्याने त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला असून त्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.
याप्रकरणी एका ६३ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या ६५ वर्षाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसलेनगरमध्ये २० मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भोसलेनगरमध्ये पती, मुलगा व सून यांच्यासह राहतात. वयोमानानुसार आता त्यांना कामे होत नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या पतीला नास्ता दिला होता. परंतु तो पुरेसा नसल्याचे त्याचे मत पडले.त्यातून पतीने त्यांना शिवीगाळ सुरु केली. जीवे मारण्याची धमकी देऊन देऊन त्यांना स्वयंपाकगृहात ढकलून दिले. त्यात त्या फरशीवर पडल्याने त्यांच्या डाव्या पायाचा खुबा फ्रॅक्चर झाला. तसेच उजव्या गुडघ्याला मुक्का मार लागला.
या प्रकाराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुलगा, सून यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.