देशात ६१ लाख टन साखरेचे उत्पादन;उत्तर प्रदेश अव्वल,सर्वाधिक कारखाने असणाऱ्या महाराष्ट्राची घसरण
By नितीन चौधरी | Updated: December 17, 2024 09:35 IST2024-12-17T09:33:20+5:302024-12-17T09:35:02+5:30
गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांची धुराडी सुरू न झाल्याने सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप कमी झाले

देशात ६१ लाख टन साखरेचे उत्पादन;उत्तर प्रदेश अव्वल,सर्वाधिक कारखाने असणाऱ्या महाराष्ट्राची घसरण
पुणे : देशात यंदाचा साखर हंगामात ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळपाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह ६१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांची धुराडी सुरू न झाल्याने सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. त्यामुळे १३ लाख ५० हजार टन साखर उत्पादन कमी झाले आहे, तर सरासरी साखर उतारा देखील ०.२५ टक्क्याने कमी आहे. आतापर्यंतच्या साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे. येथे आतापर्यंत सुमारे २३ लाख टन उत्पादन झाले आहे, तर महाराष्ट्रात सुमारे १७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षापेक्षा यंदा ३९ लाख टन साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
देशात सर्वाधिक १८३ साखर कारखानेमहाराष्ट्रात सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशात केवळ १२० कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. मात्र, येथे सरासरी साखर उतारा ८.९० टक्के मिळत असल्याने एकूण साखरेचे उत्पादन २२ लाख ९५ हजार टन झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात सरासरी साखरेचा उतारा ८.१० टक्के इतका कमी असल्याने उत्पादन केवळ १६ लाख ८० हजार टन इतकेच झाले आहे. त्यामुळे सध्या तरी उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राने ११० लाख २० हजार टन साखर उत्पादन घेऊन देशात अव्वल क्रमांक पटकावला होता.
उत्पादनात घट होण्याचा अंदाज
देशभरात आता पडलेली कडाक्याची थंडी आणि दिवसभराचे कडक ऊन पाहता हंगामाअखेर सुमारे २८० लाख टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात ३९ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. अपेक्षित २८० लाख टन उत्पादनाव्यतिरिक्त सुमारे ४० लाख टन साखरेचा वापर इथेनॉलनिर्मितीसाठी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
साखरेच्या किमान विक्री दरातील वाढ आणि साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरातील वाढ या साखर उद्योगाच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्याने ते मार्गी लागले आहेत. याबाबत पुढील दोन ते तीन आठवड्यांत निर्णय होईल. पुढील जानेवारीअखेर झालेल्या साखर उत्पादनाचा आढावा घेऊन साखर निर्यातीबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर योग्य तो निर्णय होण्याची शक्यता आहे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ