गुंतवणुकीच्या आमिषाने एनडीएच्या अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

By विवेक भुसे | Published: March 26, 2024 05:48 PM2024-03-26T17:48:58+5:302024-03-26T17:51:20+5:30

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगून सायबर चोरटे फायदा घेऊ लागले असून फसवणुकीचे गुन्हे गेल्या वर्षभरापासून वाढले आहेत.

57 lakhs bribe to an NDA officer for the lure of investment | गुंतवणुकीच्या आमिषाने एनडीएच्या अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने एनडीएच्या अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून सुरुवातीला अडीच लाख रुपये नफा झाल्याचे दर्शवून सायबर चोरट्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) अधिकाऱ्याला तब्बल ५७ लाख २२ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या एनडीएतील अधिकार्याने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १९ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एनडीएमध्ये अधिकारी आहेत. ते गुगलवर सर्च करत असताना त्यांना सायबर चोरट्यांनी एचडीएफसी सिक्युरिटी मॅनेजर म्हणून संपर्क साधला. त्यांना सिक्युरिटीमध्ये कशी गुंतवणुक करायची हे समजावून सांगितले. त्यांना कोर ट्रेडिंग ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतले. त्यात २४० सदस्य दिसत होते. त्यांना अभिजितसिंह व रमादेवी पाटील हे गुंतवणुकीविषयी गाईड करत. त्यांना गुंतवणुक केलेल्या पैशांवर दरदिवशी १० टक्के मोबदला मिळेल असे आमिष दाखविले. त्यांना ८ हजार ४०० रुपये व २ लाख ५५ हजार ४०० रुपये परतावा म्हणून देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसल्याने फिर्यादी यांनी २६ फेब्रुवारी ते २२ मार्च दरम्यान एकूण ५७ लाख ७७ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ॲपवरुन पैसे निघत नव्हते. तेव्हा त्यांना २० टक्के प्रॉफिट कमिशन व टॅक्स भरायला लागेल, असे सांगून १९ लाख ४५ हजार रुपये भरायला लावले. त्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर पैसे निघाले नाहीत. तसेच ग्रुपवरील कोणाचेही नंबर लागले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाय एन शेख तपास करत आहेत.

गुगलवरील बहुतांश ट्रेडिंग ॲप बोगस

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे लोक मानस तयार झाले असल्याने लोक गुंतवणुक करायची संधी शोधत असतात. त्याचा सायबर चोरटे फायदा घेऊ लागले असून असे फसवणुकीचे गुन्हे गेल्या वर्षभरापासून वाढले आहेत. मात्र, ऑनलाईन माहिती देणार्या बोगस साईट वाढल्या आहेत. टेलिग्रॅामच्या माध्यमातून ग्रुपमध्ये संबंधितांना सहभागी करुन घेतात. त्या ग्रुपमधील इतर सदस्य हे त्यांचेच असतात. त्यांना फायदा झाल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात ते कोणतीही गुंतवणुक करत नाही. नागरिक फायदा झाला असे समजून आपली सर्व रक्कम त्यांच्या हवाली करतात. प्रत्यक्षात हा सर्व प्रकार बनावट असतो.

Web Title: 57 lakhs bribe to an NDA officer for the lure of investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.