शहराच्या हद्दीतून दररोज ५० हजार ट्रकची ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 02:21 PM2019-12-17T14:21:54+5:302019-12-17T14:27:03+5:30

अनेक ट्रक, टेम्पो आणि खासगी बसेस या वेळेत मोठ्या प्रमाणात शहराच्या हद्दीतून धावतात.

50,000 trucks daily coming and going from city areas | शहराच्या हद्दीतून दररोज ५० हजार ट्रकची ये-जा

शहराच्या हद्दीतून दररोज ५० हजार ट्रकची ये-जा

Next
ठळक मुद्देपुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीएच्या हद्दीत शोधट्रक टर्मिनलसाठी ३०० एकर जागेची गरज

सुषमा नेहरकर-शिंदे-  
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून सध्या दररोज तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक ट्रक (अवजड वाहनांची) वाहतूक होते. यामुळे शहराच्या नागरी वाहतुकीवर ताण येत असून, शहरातील अवजड वाहनांचा वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी शहरालगतच्या परिसरामध्ये ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज आहे. यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएच्या हद्दीत तब्बल ३०० एकर जागेची आवश्यकता असल्याची माहिती पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांनी विभागीय आयुक्तांच्या आढावा बैठकीत दिली.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, एमआयडीसी, पीएमआरडीए आणि जिल्ह्याच्या हद्दीतील वाहतूक प्रश्नासंदर्भात नुकतीच विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहर, एमआयडीसी आणि संपूर्ण जिल्ह्याची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी एकत्रित विकास आराखडा  करण्याची चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शहर आणि जिल्ह्यात दररोज मोठ्या ट्रकची वाहतूक होत असून, याचा नागरी वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचे सांगितले. यासाठी शहरालगतच्या परिसरात, एमआयडीसी, पीएमआरडीएच्या हद्दीत ठिकठिकाणी ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. 
याबाबत विक्रम कुमार यांनी सांगितले, की पीएमआरडीएच्या वतीने याबाबत प्राथमिक सर्व्हे केला असून, पुणे शहर आणि परिसरातून दररोज तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक ट्रक ये-जा करतात. यामध्ये सर्वाधिक ट्रक मुंबईमार्ग १८ हजार ट्रक, सोलापूर मार्ग १० हजार ट्रक आणि नाशिक मार्ग १० हजार ट्रक व अन्य मार्गावरून १० ते १२ हजार हजार ट्रकची दररोज वाहतूक होते. शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत बंदी आहे. परंतु तरीदेखील अनेक ट्रक, टेम्पो आणि खासगी बसेस या वेळेत मोठ्या प्रमाणात शहराच्या हद्दीतून धावतात. शहर वाहतूक पोलिसांकडून अशा वाहतुकीला दंडदेखील केला जातो. परंतु त्यानंतरदेखील दिवसभर काही भागात ही वाहतूक सुरूच असते. गर्दीच्या वेळेतच अवजड वाहने धावत असल्याने शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होते. यामुळे शहराच्या हद्दीलगत असे ट्रक टर्मिनल झाल्यास शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 
दरम्यान, चाकण एमआयडीसीच्या हद्दी उभारण्यात आलेले ट्रक टर्मिनल बंद असून, यामुळेदेखील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर विभागीय आयुक्तांनी एमआयडीसीच्या अधिकाºयांना लक्ष घालून हे ट्रक टर्मिनल पुन्हा सुरळीत सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
......
शहरातील अवजड वाहनांचा प्रश्न मार्गी लागेल
सध्या शहराच्या हद्दीतून दररोज ५० हजारांपेक्षा अधिक ट्रकची वाहतूक होते. पीएमआरडीएच्यावतीने करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्यामध्ये ही आकडेवारी समोर आली असून, विविध भागांत ९-१० ठिकाणी ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज आहे. यासाठी तब्बल ३०० एकर जागेची आवश्यकता असून, पीएमआरडीएसह दोन्ही महापालिका आपल्या हद्दीत हे ट्रक टर्मिनल उभारणार आहे. त्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यातील ५० हजार अवजड वाहनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शहरातील अवजड वाहनांचा वाहतुकीचा ताण कमी होणार असून दळणवळण सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अन्य राज्यांतील वाहने शहराबाहेर थांबणार असून प्रशस्त पार्किंगसाठी जागा आणि विविध सुविधा उपलब्ध झाल्यास ट्रान्स्पोर्ट हब विकसित होण्यास मदत होईल.
- विक्रम कुमार, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी 
.........
 

Web Title: 50,000 trucks daily coming and going from city areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.