Har Ghar Tiranga: पुणे महापालिकेच्या ३०० केंद्रांवरून करणार ५ लाख झेंडे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 13:07 IST2022-08-03T13:07:07+5:302022-08-03T13:07:36+5:30
उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार

Har Ghar Tiranga: पुणे महापालिकेच्या ३०० केंद्रांवरून करणार ५ लाख झेंडे वाटप
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महापालिकेकडून १५ क्षेत्रीय कार्यालयात सुमारे ३०० केंद्रांवरून पाच लाख झेंडे मोफत वाटले जाणार आहेत. हा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी पालिकेने पाच लाख झेंडे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे गुरुवार (दि. ४) पासून टप्प्याटप्प्याने तिरंगा झेंडे उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार वाटपाचे नियोजन केले जाणार आहे. हे झेंडे नागरिकांच्या घरोघरी जाऊन मोफत वाटप करावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सुमारे ३०० ठिकाणी वाटप केंद्र असणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.